बेळगाव लाईव्ह गंगटोक (सिक्कीम) येथील तरुण जोशन राय यांनी देशभर पदयात्रा करत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकतेचा संदेश देण्याचा संकल्प केला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून ते भारतातील विविध राज्यांमधून पायी भ्रमंती करत असून, १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत त्यांनी १७ राज्यांमधून प्रवास पूर्ण केला असून १२ पैकी ९ ज्योतिर्लिंगांचे दर्शनही घेतले आहे.
सध्या बेळगावजवळ त्यांचे वास्तव्य असून, त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची माहिती मिळताच श्री राम सेना हिंदुस्थान, बेळगावचे अध्यक्ष भरत दादा पाटील यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जोशन राय यांच्या धाडसी आणि अध्यात्मिक यात्रेचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील प्रवासासाठी आर्थिक सहाय्य करून त्यांच्या उपक्रमाला पाठबळ दिले.
जोशन राय यांची ही पदयात्रा केवळ धार्मिक स्थळांच्या दर्शनापुरती मर्यादित नसून, देशातील विविध संस्कृती, परंपरा आणि लोकजीवन जवळून अनुभवण्याचाही एक प्रयत्न आहे. भारताच्या विविधतेत एकता या भावनेचा संदेश देत ते हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करत आहेत. त्यांच्या चिकाटी, श्रद्धा आणि साहसी वृत्तीमुळे अनेक युवकांना प्रेरणा मिळत आहे.

भरत दादा पाटील यांनी यावेळी बोलताना, “देशाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाशी जोडणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आहे. अशा तरुणांना समाजाने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे,” असे मत व्यक्त केले
या भेटीदरम्यान श्री राम सेना हिंदुस्थानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनीही जोशन राय यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी पाठिंबा व्यक्त केला.




