बेळगाव लाईव्ह :झेरे गल्ली, अनगोळ येथील रहिवासी सुभाष चौगले यांच्या घरासमोर भर रस्त्यात ड्रेनेज पाईपलाईनचे चेंबर खुले ठेवण्यात आले असून मृत्यूचा सापळा असलेल्या या ड्रेनेज पाईपलाईनच्या चेंबरला तात्काळ झाकण बसवण्याची मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.
झेरे गल्ली, अनगोळ येथील सुभाष चौगले यांच्या घरासमोर रस्त्यावर असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनच्या चेंबरचे झाकण गेल्या अनेक दिवसांपासून गायब आहे. त्यामुळे रस्त्यावरील ड्रेनेज चेंबरचे हे भगदाड अतिशय धोकादायक ठरू शकते आहे.
चौगुले यांच्या घरात दोन खेळतीबागडती मुलं असून इतर लहान मुलं व येणाजाणाऱ्या वाहन चालक विशेष करून दुचाकी वाहन चालकांसाठी हे खुले चेंबर जीवघेणे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात संबधीत नगरसेवक तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांना कल्पना देऊनही आजपर्यंत फक्त आश्वासनांव्यतिरिक्त कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सध्या गल्लीतील जागरूक नागरिकांनी लोकांना सावधान करण्यासाठी त्या खुल्या चेंबरच्या ठिकाणी लाकडे टाकली असली तरी धोका कमी झालेला नाही.
सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे. त्यामुळे झेरे गल्लीतील मुले रस्त्यावर खेळत असतात. त्या मुलांपैकी जर एखादे मूल अनावधानाने त्या भगदाडात पडल्यास अनर्थ घडू शकतो. याची संबंधीत नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांना खात्याला कल्पना नसने ही दुर्दैवाची बाब आहे. अलिकडेच विविध ठिकाणी मुलं पाण्याची टाकी, सेप्टिक टॅन्कमध्ये पडण्याच्या विपरित घटना घडल्या आहेत.
तसा दुर्दैवी प्रकार झेरे गल्ली येथील खुल्या ड्रेनेज चेंबरच्या ठिकाणी घडू नये यासाठी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर ड्रेनेज चेंबरला तात्काळ झाकण बसवून लहान मुलं आणि नागरिकांचा जीव सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.
तसेच जनतेच्या जीवाचे संरक्षण करणार कि अघटीत घडल्यावरच महापालिका कार्यवाही करणार? असा सवाल केला जात आहे.





