belgaum

मृत व्यक्तीच्या नावाने जमीन नोंदणी;उपनिबंधकाच्या निलंबनाची शिफारस

0
362
Sub registrar
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बनावट कागदपत्रे आणि खोट्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे मृत व्यक्तीच्या नावाने जमीन नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव दक्षिण उपनिबंधकाच्या निलंबनाची शिफारस केली आहे. तसेच संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.


अंकलगी गावातील 9 एकर 33 गुंठे जमीन 24 एप्रिल 2026 रोजी विक्री नोंदणीतून हस्तांतरित करण्यात आली होती. ही जमीन हुबळी येथील दिगंबर कुलकर्णी यांच्या नावावर होती. मात्र अधिकृत नोंदीनुसार दिगंबर कुलकर्णी यांचे सुमारे 39 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तरीदेखील विक्री दस्तऐवजात ते स्वतः उपनिबंधक कार्यालयात उपस्थित राहून व्यवहार पूर्ण केल्याचे दाखविण्यात आले होते.


या प्रकरणाची माहिती माध्यमांतून समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक तपासात दस्तऐवज पडताळणी आणि ओळख निश्चिती प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळून आल्याने संबंधित उपनिबंधकावर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे.

 belgaum

विशेष म्हणजे, याच मृत जमीनमालकाच्या नावावरील आणखी 8 एकर 37 गुंठे जमीन यापूर्वी सप्टेंबर 2024 मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे खासगी संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आली होती. त्या प्रकरणी माध्यमांतून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात याचिका दाखल झाल्यानंतर बेळगाव तहसीलदारांनी ती नोंदणी रद्द केली होती.तरीही त्याच व्यक्तीच्या नावावरील दुसरी जमीन पुन्हा बनावट पद्धतीने नोंदविण्यात आल्याने उपनिबंधक कार्यालयातील कार्यपद्धती, पडताळणी प्रक्रिया आणि सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली असून या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे महसूल व नोंदणी विभागातील गैरप्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.


Sub registrar

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.