बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन करून नशा करणाऱ्यांविरुद्ध मार्केट पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली असून, महाद्वार रोड परिसरात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे २०२६ रोजी महाद्वार रोड परिसरात काही तरुण संशयास्पद आणि विचित्र हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या आधारे मार्केट पोलीस ठाण्याचे एएसआय शंकर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून कारवाई केली.
पहिली कारवाई विजय संजू कवळकर (वय २१, रा. समर्थ नगर) याच्यावर सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी अटक करत त्याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ९६/२०२६ नुसार एनडीपीएस कायद्याच्या कलम २७(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर दुसऱ्या कारवाईत सिद्धार्थ युवराज पाटील (वय १९, रा. महाद्वार रोड) याला सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. . वैद्यकीय तपासणीत त्याने गांजा सेवन केल्याचे सिद्ध झाल्याने, त्याच्यावर गुन्हा क्रमांक ९७/२०२६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
मार्केट पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी कौतुक केले आहे. अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या तरुणांवर आणि विक्री करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.




