belgaum

आलिशान कार घेणाऱ्या ‘करवे’ नेत्याची सीआयडीकडून चौकशी

0
73
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या तब्बल ४,५०० कोटी रुपयांच्या भव्य ठेवधारक फसवणूक प्रकरणाचा सीआयडी तपास आता अंतिम टप्प्यात आला असून, यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या महाघोटाळ्यातील मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावर याच्याकडून एक आलिशान कार भेट म्हणून घेतल्याच्या गंभीर आरोपावरून, ‘कर्नाटक रक्षण वेदिके’ ( प्रवीण शेट्टी गट) चे जिल्हाध्यक्ष तथा अभिनेते आर. अभिलाष मंगळवारी माळमारुती पोलीस ठाण्यात सीआयडी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. सीआयडीच्या कडक नोटिसीमुळे अखेर अभिलाषला या आलिशान कारच्या सर्व मूळ कागदपत्रांसह चौकशीला सामोरे जावे लागले.

सीआयडीच्या विशेष पथकाने केलेल्या तपासात एक धक्कादायक दुवा समोर आला आहे. मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावर याने ‘बेळगाव उत्सव’ हा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर, आर. अभिलाष याला तब्बल १७ लाख रुपये किमतीची सेकंड हँड मर्सिडीज बेंझ ही आलिशान कार भेट म्हणून दिली होती. सर्वसामान्यांच्या घामाचा पैसा लुटून ही आलिशान कार खरेदी करण्यात आल्याचा दाट संशय सीआयडीला आहे.

याच आलिशान कारची खरेदी आणि तिच्या मालकी हक्काबाबत सीआयडीने अभिलाषला फैलावर घेतले. मंगळवारी माळमारुती पोलीस ठाण्यात सीआयडीच्या डीवायएसपींनी अभिलाषची कित्येक तास कसून चौकशी केली. त्यांच्यातील संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि या आलिशान कारमागचे नेमके गुपित काय, याबाबींची संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांनी गोळा केली आहे.

 belgaum

या ४,५०० कोटींच्या घोटाळ्याचे धागेदोरे खूप दूरपर्यंत पसरले असून सीआयडीने मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावरची पत्नी आणि त्याचा बिझनेस पार्टनर सुभाष यांनाही नोटिसा बजावून त्यांची सखोल चौकशी केली आहे.

सीआयडीने या संपूर्ण प्रकरणात आता भक्कम पुरावे गोळा केले असून तपास पूर्णत्वाकडे झुकला आहे. याच कारवाईचा पुढचा भाग म्हणून मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावर याला आज, म्हणजेच बुधवारी न्यायालयात हजर करण्यासाठी सीआयडीच्या पथकाने चक्र फिरवली आहेत. या हाय-प्रोफाईल कारवाईमुळे बेळगावच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.