बेळगाव लाईव्ह : कडक उन्हाची तीव्रता वाढत असतानाच खडे बाजार परिसरात पाइपलाइनला गळती लागल्याने पाण्याची नासाडी होत आहे. शहरात पाणीटंचाईची शक्यता वर्तवली जात असताना पाणी पुरवठा विभागाकडून दुरुस्तीबाबत होत असलेल्या विलंबामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
शहरातील गजबजलेल्या खडे बाजार आणि गणपत गल्लीच्या कोपऱ्यावर गेल्या काही दिवसांपासून पाइपलाइनमधून पाणीगळती सुरू आहे. सध्या कडक उन्हामुळे जलाशयातील पाणीपातळी वेगाने खाली जात आहे. अशा परिस्थितीत मुख्य बाजारपेठेतच पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
एकीकडे प्रशासन नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन करत असताना, दुसरीकडे गळतीमुळे पाणी वाया जात आहे. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ही गळती वर्दळीच्या ठिकाणी असूनही संबंधित विभागाकडून अद्याप ठोस पावले उचलली गेली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्याची परिस्थिती पाहता पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन दुरुस्तीचे काम पूर्ण करावे,
वाढत्या उन्हाळ्यात पाण्याची बचत महत्त्वाची असल्याने प्रशासनाने याबाबत तत्परता दाखवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.





