बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर महाराष्ट्र सरकारने आता ठोस पावले उचलावीत, या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने थेट दख्खनचा राजा श्री जोतिबा चरणी आपले पत्र अर्पण करत, महाराष्ट्र राज्याचे सीमासमन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांना सविस्तर निवेदन पाठवले आहे. या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांसोबत समितीच्या शिष्टमंडळाची तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यात सीमाप्रश्नावरून चांगलीच जुगलबंदी रंगली होती. “तुम्ही समन्वयक मंत्री आहात, मग सीमाभागात का जात नाही? तेथील मराठी माणसाचे दुःख कधी जाणून घेणार?” असा सवाल जयंत पाटील यांनी केला होता. या राजकीय टोलेबाजीनंतर आता मध्यवर्ती समितीने थेट चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून प्रत्यक्ष कृती करण्याची आणि मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणण्याची वेळ आली असल्याची आठवण करून दिली आहे.
समितीने पत्रात मुख्यत्वे दोन मागण्यांवर भर दिला आहे. पहिली मागणी म्हणजे, महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सीमाभागातील परिस्थितीची माहिती द्यावी.
१४ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत दोन्ही राज्यांच्या तीन-तीन मंत्र्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला होता, मात्र या समितीची अद्याप एकही बैठक झालेली नाही. कर्नाटक सरकारकडून सुरू असलेली कन्नड सक्ती, मराठी फलक हटवणे आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या अधिकारांची पायमल्ली या गोष्टी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे.
दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला दावा अत्यंत कूर्मगतीने चालला असल्याबद्दल समितीने चिंता व्यक्त केली आहे. “न्यायालयात दावा प्रलंबित आहे” असे साचेबंद उत्तर देण्याऐवजी, सरकारने ज्येष्ठ वकिलांशी चर्चा करून सुनावणीसाठी तातडीने अर्ज दाखल करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

केंद्र सरकार आसाम-मेघालय किंवा आसाम-मिझोराम या राज्यांचे सीमावाद सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ शकते, तर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत उदासीनता का? असा जळजळीत सवाल या पत्राद्वारे विचारण्यात आला आहे.
या पत्रावर अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर आणि सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जोतिबा चरणी पत्र अर्पण करणाऱ्या समिती कार्यकर्त्यांमध्ये नगरसेवक रवी साळुंखे माजी नगरसेवक मनोहर हलगेकर माजी नगरसेवक विजय भोसले,शेतकरी नेते भाऊ पाटील आदी यावेळी उपस्थित होते.





