belgaum

संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडले हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम

0
264
 belgaum

बेळगाव लाईव्ह :शेतकऱ्यांचा विरोध डावलून सुरू असलेल्या हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या ठिकाणी प्रकरण न्यायप्रविष्ठ असलेल्या शेतामध्ये कंत्राटदाराने सुरू केलेले काम संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडल्याची घटना आज शुक्रवारी घडली.

तीबार पीक देणाऱ्या सुपीक जमिनीतून रस्ता करण्यास अल्पभूधारक शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असूनही हालगा -मच्छे बायपास रस्ता करण्याचा आपला हट्ट सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोडलेला नाही. शेतकऱ्यांच्या विरोधाला तोंड देत संथ गतीने या रस्त्याच्या निर्मितीचे काम सुरूच आहे.

मात्र हे काम करताना प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून न्यायालयाचा देखील आदर न करण्याचा प्रकार आज घडला, जेंव्हा बायपास विरोधात प्रकरण न्यायप्रविष्ठ असलेल्या शेत जमिनीमध्ये खुदाई सुरू करण्यात आली.

 belgaum

आपल्या सुपीक शेत जमिनी वाचविण्यासाठी हलगा -मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात कांही शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली असून संबंधित प्रकरणांची सुनावणी अद्याप सुरू आहे. त्यामुळे आजपर्यंत संबंधीचे शेतजमिनी वगळून रस्त्याचे विकास काम सुरू होते. तथापि आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदाराने त्या जमिनीमध्ये देखील जेसीबी, टिप्पर व पोकलेन घुसवून खुदाई सुरू केली. याबाबतची माहिती मिळताच जमीन मालक शेतकऱ्यांसह शेतकरी नेते प्रकाश नायक आणि त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी सुरू असलेले काम बंद पाडून कंत्राटदाराला जाब विचारला. घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील त्या ठिकाणी दाखल झाले.

याप्रसंगी शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी कंत्राटदाराला धारेवर धरले. विकास कामाला अडथळा येऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला हा रस्ता करायला देत आहोत ही मेहरबानी समजा. न्यायालयाचा सन्मान करून नियम कायद्यानुसार तुमचे काम करा. उच्च न्यायालयामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे येथील जमिनीबाबतचे खटले सुरू आहेत, त्याचा निकाल लागेपर्यंत त्यांच्या जमिनीमध्ये पाऊल ठेवू नका. तुमच्या लोकांकडून शेतकऱ्यांना दिला जाणारा त्रास थांबवा.

तुम्हाला याच पद्धतीने काम करायचे असेल तर आम्ही न्यायालयाचा आदेश मानत नाही, आम्ही दादागिरी करून काम करतो, अशा दोन ओळी तुमच्या वरिष्ठांना लेखी लिहून देण्यास सांगा. यापूर्वी तीन वेळा या पद्धतीने नियम कायदा धाब्यावर बसवण्याचा प्रकार तुम्ही केला आहे. आता चौथ्यांदा जर असे घडले तर आम्ही शेतकरी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने समज देऊ. तुमचे सुरू असलेले रस्त्याचे संपूर्ण काम आम्ही बंद पाडू, असा इशारा शेतकरी नेते नायक यांनी दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.