बेळगाव लाईव्ह :खंजर गल्ली, बेळगाव येथील मोडक्या बाजाराजवळ सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून सीसीबी पोलिसांनी काल तिघाजणांना अटक करण्याबरोबरच त्यांच्या जवळील रोख 11,180 रुपये व जुगार असे साहित्य जप्त केले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे अशोक लक्ष्मण पवार (वय 51, रा. मरगाई गल्ली सावगाव बेळगाव), गजानन भावकन्ना पाटील (वय 48 रा. कृष्ण देवस्थानाजवळ 3 रा क्रॉस हनुमाननगर बेळगाव) आणि पवन विष्णू भातकांडे )रा. भातकांडे गल्ली बेळगाव) अशी आहेत.
हे तिघेही मार्केट पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील खंजर गल्ली येथील मोडक्या बाजारा जवळच्या खुल्या जागेत सार्वजनिक ठिकाणी श्रीदेवी नाईट मन बजार नामक मटका जुगार खेळत होते. याबाबतची माहिती मिळताच सीसीबी पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकून तिघाही आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले.
तसेच त्यांच्या जवळील एकूण 11,180 रुपये रोख आणि मटक्याच्या चिठ्ठ्या वगैरे जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.





