belgaum

चोरट्यांनी फोडले पत्रकाराचे घर

0
441
 belgaum

बेळगाव लाईव्ह :एका पत्रकाराचे कुलूप बंद घर फोडून चोरट्यांनी काल बुधवारी रात्री रोख 20 हजार रुपयांसह साक्षी-पुरावा नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही डीव्हीआर यंत्रणाच लंपास केल्याची घटना खानापूर तालुक्यातील कालमनी गावात उघडकीस आली आहे.

खानापुरातील पत्रकार व मुख्याध्यापक असलेले सुनील चिगुळकर यांच्या घरी ही चोरीची घटना घडली आहे. कालमनी येथील आमटे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिगुळकर यांचे घर आहे.

मुलांच्या शिक्षणाच्या कारणास्तव कांही महिन्यांपासून ते कुलूप लावून बंद ठेवण्यात आले होते. बंद असलेले हे घर हेरून चोरट्यांनी काल बुधवारी रात्री घराचा मागील दरवाजा फोडून घरात चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी आतील तीनही खोल्यांच्या दरवाजांना लावलेली कुलपे तोडून पैसे व किमती ऐवज शोधण्यासाठी गोदरेजच्या कपाटांसह अन्य कपाटांमधील साहित्य, कपडे विस्कटवून टाकले होते. अखेर कपाटातील रोख 20 हजार रुपये आणि घराच्या सुरक्षेसाठी बसविलेले सीसीटीव्ही यंत्रणेसह डीपीआर तोडून घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

सध्या मुंबईमध्ये असलेल्या घरमालक सुनील चिगुळकर यांना काल मध्यरात्री त्यांच्या मोबाईलमध्ये कालमनी येथील घरातील सीसीटीव्ही संपर्क तुटल्याचे निदर्शनास आले. तेंव्हा त्यांनी लागलीच शेजाऱ्यांशी संपर्क साधून नेमके काय झाले याची शहानिशा करण्याची विनंती केली.

त्यावेळी घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक खानापूर पोलिसांसह जांबोटी औटपोस्टच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याखेरीज चोरट्यांचा माग काढण्यासाठी ठसे तज्ञ आणि पोलीस श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले. पोलीस श्वान पथक चिगुळकर यांच्या घरापासून कालमनी -आमटे रस्त्यावर कांही अंतर जाऊन तेथेच घुटमळले.

त्यामुळे चोरट्याने तेथून एखाद्या वाहनाने पलायन केल्याचा, तसेच घटनास्थळी ठसे सापडत नसल्यामुळे त्यांनी तोंडावर मास्क आणि हातात हातमोजे परिधान केले असावेत असा कयास व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून चोरट्यांचा तपास जारी आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.