बेळगाव लाईव्ह :बेळगावमध्ये सुरू असलेली मुरगेंद्रगौडा करंडक अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पुढील दोन दिवसांत उपांत्य आणि अंतिम सामने रंगणार असून रविवारी विजेत्याचा फैसला होणार आहे. स्पर्धा अधिकच थरारक होणार असल्याचे आयोजक ॲड. मुरगेंद्रगौडा पाटील यांनी सांगितले.
मुरगेंद्रगौडा पाटील स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेत विक्रमी ५ लाख रुपयांहून अधिक बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे. सरदार हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेला गेल्या आठ दिवसांपासून क्रिकेटप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
पुणे, मुंबई, गुजरात, गोवा, तेलंगणा आदी राज्यांतील नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतल्याने सामने चुरशीचे होत आहेत. राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंमुळे स्थानिक तरुणांनाही दर्जेदार क्रिकेट पाहण्याची आणि शिकण्याची संधी मिळत आहे.


या स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे बेळगावात मोठ्या पातळीवरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा घेऊन खेळाडूंना व्यासपीठ देणे आणि स्थानिक खेळाडूंना प्रेरणा देणे हा आहे. मोठी बक्षीस रक्कम देऊन खेळाडूंच्या मेहनतीचा सन्मान व्हावा, असेही आयोजकांनी स्पष्ट केले.
गेल्या अनेक वर्षांच्या तयारीनंतर ही स्पर्धा साकार झाली असून विविध मंडळे, संस्था आणि समाजातील सर्व घटकांच्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वीपणे पार पडत आहे. रविवारी अंतिम सामना होणार असून क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




