belgaum

कणबर्गीच्या श्री सिद्धेश्वर मंदिरात महाप्रसादाचा सोहळा

0
225
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावजवळील कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी रांगा लावून प्रसादाचा लाभ घेतला असून, सुशोभित गाड्यांची मिरवणूक आणि विशेष पूजेनंतर सुरू झालेला हा सोहळा सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता.

कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त भक्तीचा महाकुंभ पाहायला मिळाला. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता आज महाप्रसादाने झाली. या कार्यक्रमाची माहिती देताना गजानन सिद्राय सांबरेकर यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला असून, सकाळी १० वाजल्यापासून प्रसादाचे वाटप अखंडपणे सुरू होते.

माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी मंदिराच्या महत्त्वाबद्दल बोलताना सांगितले की, कणबर्गीचे श्री सिद्धेश्वर मंदिर हे शेकडो वर्षांचा इतिहास असलेले अत्यंत जागृत देवस्थान आहे. केवळ महाशिवरात्रीच नव्हे तर श्रावण महिन्यातही येथे मोठी यात्रा भरते. या देवस्थानावर भाविकांची अढळ श्रद्धा असून दरवर्षी भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे गावातून काढण्यात आलेली सुशोभित गाड्यांची मिरवणूक. गावातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत ही मिरवणूक मंदिरात पोहोचल्यानंतर तिथे अभिषेक आणि महापूजा संपन्न झाली. त्यानंतर महाप्रसादाचे पूजन करून भाविकांना वितरण करण्यात आले.

मंदिर परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने चोख बंदोबस्त आणि भव्य मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. श्री सिद्धेश्वर व्यवस्थापक मंडळ आणि कणबर्गी ग्रामस्थांनी या संपूर्ण महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.