belgaum

कचरा फेकणाऱ्या रिक्षा चालकाला घडवली अद्दल!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :खादरवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी रिक्षा भरून कचरा फेकून अस्वच्छता निर्माण करणाऱ्या एका ऑटो रिक्षा चालकाला संतप्त गावकऱ्यांनी फेकलेला कचरा त्याच्याच रिक्षामध्ये भरून माघारी पाठवण्याद्वारे चांगलीच अद्दल घडवल्याची घटना आज शनिवारी सकाळी खादरवाडी (ता. जि. बेळगाव) येथे घडली.

बेळगाव शहरालगत असलेल्या खादरवाडी गावच्या गायरान जमिनीमध्ये कचरा डेपो भरण्याचा घाट रचला जात आहे. तथापि गावकऱ्यांचा त्याला तीव्र विरोध असून या कचरा डेपोच्या विरोधात त्यांचा संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह आसपासच्या गावातील नागरिकांकडून खादरवाडी गावाच्या मुख्य रस्त्याशेजारी घरगुती कचरा, शिळे अन्न भरलेल्या पिशव्या फेकण्यात येत आहेत.

त्यामुळे रस्त्याकडेला कचऱ्याचे साम्राज्य पसरून दुर्गंधीयुक्त अस्वच्छ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे खादरवाडी गावातील त्रस्त सामाजिक कार्यकर्ते व गावकरी रस्त्याशेजारी कचरा फेकण्याच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न करत आहेत. त्याचाच भाग म्हणून सतर्क गावकऱ्यांनी आज शनिवारी सकाळी एका ऑटोरिक्षा चालकाला रस्त्याशेजारी कचरा फेकताना रंगेहात पकडले.

 belgaum

त्यावेळी चौकशीत रिक्षा भरून आणलेला तो कचरा टिळकवाडीतून आणण्यात आला होता. तेंव्हा त्या ऑटो रिक्षा चालकाला संतप्त सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील व गावकऱ्यांनी धारेवर धरत चांगली समज दिली. एवढे करून न थांबता गावकऱ्यांनी त्या ऑटो रिक्षा चालकाला अद्दल घडवण्यासाठी फेकलेला सर्व कचरा पुन्हा गोळा करून आपल्या रिक्षातून माघारी घेऊन जाण्यास भाग पाडले.

याप्रसंगी बोलताना सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील यांनी सतर्क गावकऱ्यामुळे आज खादरवाडी गावच्या रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात कचरा फेकण्याचा डाव फसल्याचे सांगितले. तसेच या ठिकाणी जो कचरा टाकण्यात येणारा कचरा हा बाहेरचा आहे. यापुढे या ठिकाणी कचरा टाकताना कोणी आढळल्यास त्याला पकडून फेकलेला कचरा गोळा करून त्याच्या घरात नेऊन टाकण्यात येईल, असा इशारा राकेश यांनी दिला.

आधीच आमचा कचरा डेपोच्या विरोधात मोठा संघर्ष सुरू आहे. तेव्हा माझी खादरवाडी गावकऱ्यांच्यावतीने बेळगाव शहरासह आसपासच्या गावातील लोकांना विनंती आहे की कृपया या ठिकाणी कोणीही कचरा फेकू नये, असे जाहीर आवाहनही राकेश पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.