belgaum

‘या’ मागणीसाठी आशा कार्यकर्त्यांचा शहरात भव्य मोर्चा

0
188
 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या येत्या मार्च 2026 मध्ये जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आशा कार्यकर्त्यांना सरकारने दिलेल्या आश्वासनांसह त्यांच्या मागण्यांची पूर्तता केली जावी, अशी मागणी बेळगाव जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या भव्य मोर्चाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

एआययुटीयुसीशी संलग्न कर्नाटक राज्य संयुक्त आशा कार्यकर्ता संघटनेच्या बेळगाव जिल्हा समितीच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सकाळी आशा कार्यकर्त्यांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चाचा प्रारंभ सरदार हायस्कूल मैदानावरून झाला.

मोर्चामध्ये बेळगाव शहर तालुक्यासह जिल्ह्यातील असंख्य आशा कार्यकर्त्या गुलाबी साड्या परिधान करून सहभागी झाल्या होत्या. आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भातील घोषणा देत निघालेला आशा कार्यकर्त्यांचा हा मोर्चा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.

राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये सदर मोर्चाची सांगता झाली. त्या ठिकाणी आशा कार्यकर्त्यांनी भर उन्हात जमिनीवर ठिय्या मारून कांही काळ धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आंदोलनकर्त्या आशा कार्यकर्त्यांची भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन त्यांना सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून ते तातडीने मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्याचे, तसेच आपल्यापरीने आपण आशा कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याचा सर्वत्र प्रयत्न करू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.