बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी बागलकोट येथील नागराज कलगुटकर या व्यक्तीने भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ विधानसभेसाठी छेडलेले एक दिवसाचे सांकेतिक आंदोलन काहीसे अलिप्त राहून देखील महत्त्वाचा संदेश देऊन गेले.
आपल्या ‘स्वच्छ विधानसभा अभियाना’बद्दल बेळगाव लाईव्हला माहिती देताना नागराज कलगुटकर म्हणाले की, माझ्या स्वच्छ विधानसभा अभियानांतर्गत आजपर्यंत गेल्या 6 महिन्यात मी 18 जिल्हे आणि 17 विधानसभा मतदार संघामध्ये फिरवून जनजागृती केली आहे. स्वच्छ विधानसभा अभियानांच्या माध्यमातून मी जनतेला विनंती करतो की त्यांनी इमानदारीने मतदान करावे.
पैसे, दारू, सुखवस्तू साहित्य वगैरे कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करा. जाती -धर्मावर मतदान करू नका. समाजातील सुशिक्षित आणि प्रामाणिक लोकांनी पुढे येऊन जनतेसमोर उभे राहून निवडणुका लढविल्या पाहिजेत, अशा दोन-तीन मुद्यांना घेऊन मी जनजागृती करत आहे. सरकारला देखील माझी विनंती आहे की, त्यांनी प्रामाणिकपणे सरकार चालवावे.
आज भ्रष्टाचार इतका वाढला आहे की त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा आवाज दाबला जातो. एक तर त्याच्यावर हल्ला होतो किंवा पोलीस त्याला खोट्या गुन्ह्याखाली गजाआड करतात. जर सरकारच असे काम करत असेल तर जनतेने कोणाकडे जायचे? त्यामुळे आज भ्रष्टाचार मुक्त सत्ता चालवणे काळाची गरज बनली आहे. यासाठीच आज एक दिवसासाठी मी सरकार विरुद्ध सांकेतिक आंदोलन करत आहे.

काल सभागृहात चर्चा होत असताना खुद्द एका आमदाराने ब्युरोक्रेट्स अर्थात सरकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. ‘बिरोक्रॅटिक करप्शन’ आणि ‘करप्ट पोलीस’ या दोन शब्दांवर काल फार मोठी चर्चा झाली. स्वतः आमदारच म्हणत होते की “भ्रष्टाचार इतका वाढला आहे की, आता आपल्याला काहीतरी करावंच लागेल.” तेंव्हा दुसरे एक आमदार म्हणतात की, “सरकारी अधिकारी आणि पोलिसांपेक्षा आम्हीच जास्त भ्रष्ट आहोत. आम्ही स्वतःच पैसे, दारू वगैरेंचे वाटप करून निवडणूक जिंकून येथे येतो. तेंव्हा आपणच सर्वप्रथम प्रामाणिकपणे निवडणूक लढवली पाहिजे.” त्यांचे हे म्हणणे अगदी बरोबर आहे. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की, आगामी 2028 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकी वेळी काँग्रेस भाजप वगैरे सर्व राजकीय पक्षांनी इमानदारीने निवडणूक लढवावी.
जर त्यांच्याकडून ते होत नसेल तर शिकल्या सवरलेल्या लोकांनी पुढे येऊन प्रामाणिकपणे निवडणूक लढवावी. समोरचा कोट्यावधी रुपये खर्च करू दे, परंतु आपण प्रामाणिकपणे निवडणूक घडवायची असा त्यांचा निश्चय हवा. आम्ही प्रामाणिकपणे निवडणूक लढवत आहे आम्हालाही मते द्या. आम्हाला देखील समाज आणि देश सेवा करण्याची संधी द्या. असे आवाहन त्यांनी जनतेला करावे. प्रामाणिकपणे सत्ता कशी चालवता येते हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ, असा विश्वास त्यांनी जनतेला दिली पाहिजे. हे सर्व व्हावे हाच माझ्या या अभियानाचा मुख्य उद्देश आहे, असे नागराज कलगुटकर यांनी शेवटी सांगितले.




