बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. रस्त्यांवर, महत्त्वाच्या चौकांमध्ये, रेल्वे स्टेशन परिसरात, निवासी वसाहतींमध्ये आणि शाळा-महाविद्यालयांजवळ कुत्र्यांचे कळप मोकाट फिरताना दिसतात. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने केवळ औपचारिकतेने पाहिल्यामुळे शहरातील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.
या प्रशासकीय दुर्लक्षाचा परिणाम नुकताच एका तरुण जीवाला गमवावा लागल्याने परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.
माळी गल्ली येथील २२ वर्षीय ऐश्वर्या नारायण बडमंजी ही २१ ऑक्टोबर रोजी दुचाकीवरून जात होती. रेल्वे स्टेशनजवळ अचानक कुत्र्यांच्या कळपाने रस्त्यावर धाव घेतली.
या कुत्र्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ती गंभीर जखमी झाली. अनेक दिवस तिच्यावर उपचार सुरू होते; मात्र अखेर सोमवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. एका निष्पाप युवतीचे स्वप्न, कुटुंबाची आशा आणि भविष्य केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नष्ट झाले.
या घटनेमुळे शहरात काही मूलभूत प्रश्न उपस्थित झाले आहेत: शहरात एवढे भटके कुत्रे वाढले कसे? मुख्य कारण म्हणजे शहरात स्वच्छतेचा अभाव, कचरा उघड्यावर टाकणे, रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालणे आणि महानगरपालिकेच्या नसबंदी मोहिमेतील सुस्ती. मनपा कधीकधी मोहीम राबवते, काही दिवस कुत्रे पकडते, पण लवकरच परिस्थिती पुन्हा जशीच्या तशी होते.
ही केवळ एक दुर्घटना नसून, ही गंभीर चेतावणी आहे. शहरातील शाळकरी मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांना दररोज जीवघेण्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनीही जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे; मात्र प्रशासनाची जबाबदारी निश्चितच अधिक आहे. कुत्र्यांची नियमित नसबंदी, परिसरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापनातील सुधारणा आणि धोरणात्मक नियंत्रणाशिवाय ही समस्या कायमस्वरूपी सुटणार नाही.
ऐश्वर्याच्या मृत्यूमुळे बेळगाव शहराने एका तरुण मुलीचा जीव गमावला आहे. प्रशासनाने किमान आता तरी जागे व्हावे, अन्यथा पुढचा बळी कोण असेल, ही भीती शहरात व्यक्त होत आहे.




