बेळगाव लाईव्ह :लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप असलेले कणेरी मठाचे मठाधीश श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांना धारवाड जिल्ह्यात प्रवेश करण्यास जिल्हाधिकारी दिव्या प्रभू यांनी निर्बंध घातले आहेत.
जागतिक लिंगायत महासभेने श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्यावर लिंगायत समाजाच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे विधान केल्याची तक्रार करत धारवाडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वामीजींच्या धारवाड जिल्ह्यातील प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
धारवाड जिल्ह्यातील अण्णीगिरी तालुक्यातील हळ्ळीकेरी गावात येत्या 5, 6 व 7 नोव्हेंबर रोजी श्री सहजानंद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहासाठी कन्हेरी मठाच्या स्वामीजींना अधिकृत निमंत्रणही देण्यात आले आहे.
तथापि त्यांच्या धारवाड जिल्ह्यातील प्रवेशावर निर्बंध घालण्याची मागणी जोर धरू लागल्यामुळे आता जिल्हाधिकारी दिव्या प्रभू यांनी त्यांना धारवाड जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई असल्याचा आदेश जारी केला आहे.



