बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा आणि कार्तिक स्नानाची समाप्ती आज बुधवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
त्रिपुरारी पौर्णिमा आणि कार्तिक स्नानाच्या समाप्ती निमित्त सौंदत्ती डोंगरावरील श्री यल्लमा अर्थात रेणुका देवी मंदिरामध्ये आज विशेष पूजा-अर्चेसह उत्सव साजरा करण्यात आला.
त्याचबरोबर मंदिरात आणि बाहेर फुले, फुलांच्या माळा आणि दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केल्याच्या निमित्ताने दीपदान आणि दीपोत्सवाचे आयोजन केले जाते, ज्याची सांगता श्री रेणुका देवी मंदिरात होत असते.

त्रिपुरारी पौर्णिमा आणि कार्तिक स्नानाच्या समाप्ती उत्सवात सहभागी होण्यासाठी बेळगाव जिल्हासह कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील हजारो भाविक डोंगरावर दाखल झाले होते. उत्सवाच्या निमित्ताने श्री रेणुका देवी मंदिर परिसरातील बाजारपेठ विविध साहित्य आणि सजावटीने सजली होती.
देवीच्या मंदिर परिसरातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे पहावयास मिळत होते. त्यामुळे सौंदत्ती डोंगरावरील बाजारपेठेचा व्यवसाय आज मोठ्या तेजीत होता.


