बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती शहराच्या रामसाईट परिसरात प्रेमविवाह केलेल्या पत्नीला पोलीस पतीनेच ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तीन दिवसांपूर्वी खून झालेली बस वाहक काशम्मा नेल्लिकट्टी या महिलेचा पोलीस शिपाई असलेला तिचा पती संतोष कांबळे याने हा खून केला आहे. काशम्मा आणि संतोष यांनी १३ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता.
लग्नानंतर पत्नीवर संशय घेऊन संतोष तिला त्रास देऊ लागला. पत्नीला छळणे आणि शारीरिक मारहाण करण्याच्या संतोषच्या त्रासाला कंटाळून काशम्माने त्याच्यासोबत न राहण्याचा निर्णय घेत माहेर गाठले. त्यानंतर तिने सवदत्ती डेपोमध्ये बदली करून घेतली. यानंतर दोघांनी बैलहोंगल कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
माहेरीही न राहता काशम्माने सवदत्ती शहरात भाड्याने घर घेतले होते आणि ५ एप्रिल २०२५ रोजी तिला कोर्टाकडून घटस्फोटही मिळाला होता.
या घटनेनंतरही संतोष पत्नीला फोन करून शिवीगाळ करत होता. १३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आठ वाजता संतोष काशम्माच्या घरी गेला आणि तिच्याशी भांडण केले.
त्याने पत्नीचा गळा चिरला, पोटात तीन वेळा वार करून तिचा खून केला. त्यानंतर तो तिथून पळून गेला. तीन दिवसांनंतर दुर्गंधी आल्यामुळे स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. सवदत्ती पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून फरार आरोपी संतोषचा शोध घेत आहेत.


