बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून, जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत उद्या, बुधवार, २५ जून रोजी बेळगाव आणि खानापूर या दोन्ही तालुक्यांमधील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विविध भागांमध्ये विशेषतः बेळगाव आणि खानापूर तालुक्यांत, पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत, सखल भागांमध्ये पाणी साचले आहे आणि वाहतुकीतही अडथळे निर्माण झाले आहेत.
अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचताना कोणतीही अडचण येऊ नये किंवा त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, यामध्ये शासकीय, अनुदानित तसेच विनाअनुदानित सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. प्रशासनाने नागरिकांनाही पावसाळ्यात सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे.



