Tuesday, July 15, 2025

/

हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका… उपकरणे वायरिंग जळाली

 belgaum

बेळगाव लाईव्ह : हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीच्या वेळी केलेल्या चुकीमुळे हाय व्होल्टेज करंट अर्थात उच्च दाबाचा वीज प्रवाह निर्माण होऊन अनगोळ येथील चौथ्या रेल्वे गेटच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील कांही घरे आणि दुकानांमधील विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान झाल्याची घटना काल रविवारी दुपारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अनगोळ येथील चौथ्या रेल्वे गेटच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या परिसरातील वीजपुरवठा काल रविवारी सकाळी खंडीत झाला होता. त्यामुळे विजेच्या खांबावरील आवश्यक दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी हेस्कॉमने दुपारी आपले दोन नवीन लाईनमन चौथा रेल्वे गेटच्या रस्त्याकडे पाठवले होते.

तथापि दुरुस्ती करताना या नवागत लाईनमन्सनी वायरिंची उलटसुलट चुकीची जोडणी केल्यामुळे मुख्य तारांमधून हाय व्होल्टेज अर्थात विजेचा उच्च दाबाचा प्रवाह निर्माण झाला. या पद्धतीने अचानक उच्च दाबाचा वीज पुरवठा झाल्यामुळे जवळपासच्या सुमारे आठ -दहा घरे, दूध डेअरी, हॉटेल आणि दुकानांमधील टीव्ही, फ्रिज, पंखे, कॉम्पॅक्ट सिस्टीम, वीज मीटर, सीसी कॅमेरे वगैरे उपकरणे जळून मोठे नुकसान झाले. या पद्धतीने हेस्कॉम कर्मचाऱ्यांच्या चुकीचा फटका सर्वसामान्य आम्हाला बसला असल्यामुळे याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल संबंधित नुकसानग्रस्त नागरिकांनी केला असून हेस्कॉमकडे नुकसान भरपाईची मागणीही केली आहे.

 belgaum

घडल्या घटनेसंदर्भात बेळगाव लाईव्हसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना स्थानिक रहिवाशी परविन मोहम्मदअली मुंशी यांनी हाय व्होल्टेज विजेमुळे आमच्या घरातील चारही खोल्यांमध्ये ट्यूबलाइट वगैरे विजेचे दिवे आणि पंखे जळाले आहेत. त्यामुळे काल रात्रभर घरामध्ये लाईट नसल्यामुळे आम्हाला अंधारात वावरावे लागले. काल दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता.

आम्ही दररोज राबवून खाणारे गरीब लोक आहोत असे सांगून आता आमच्या घरातील विजेचे टीव्ही, दिवे, पंखे जळाले आहेत. याला जबाबदार कोण? झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? असा सवाल परविन मुंशी यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.