बेळगाव लाईव्ह :वनविभाग व हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे सदाशिवनगर फर्स्ट मेन, फर्स्ट क्रॉस येथील महाराष्ट्र बँकेसमोरील उच्च दाबांच्या विजेच्या मुख्य तारांवर (हायटेन्शन वायर) झाडाची फांदी पडल्याने आग लागून एकच घबराट उडाल्याची घटना गेल्या शनिवारी संध्याकाळी घडली.
सदाशिवनगर फर्स्ट मेन, फर्स्ट क्रॉस येथील महाराष्ट्र बँकेसमोरील मुख्य विजेच्या उच्च दाबांच्या तारांशेजारी असलेले धोकादायक मोठे झाड तोडण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून गेल्या पाच-सहा वर्षांपासून वन विभाग आणि हेस्कॉमकडे लेखी अर्जाद्वारे केली जात आहे.
तथापी अर्ज सादर केल्यानंतर परस्परविरोधी उत्तरे देऊन जबाबदारी टाळण्याचा प्रकार केला जात असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जाब विचारल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून “झाड पडल्यानंतर पाहूया, वेळ मिळाल्यावर पाहू,” अशी उद्धट उत्तरे मिळत असल्याचे समजते.

गेल्या शनिवारी संध्याकाळी ठीक 5:30 वाजता उच्च दाबाच्या विजेच्या तारांवर झाडाची फांदी कोसळून आग लागण्याची घटना घडली. त्यामुळे वायर आणि फांदीने पेट घेण्याबरोबरच जवळच्या अर्बन बेकरी अँड आईस्क्रीम पार्लरमधील वायरिंग जळाली. त्यावेळीही संबंधित अधिकाऱ्यांना स्थानिकांनी त्वरित फोन केला होता.
मात्र ते वेळेवर पोहोचले नाहीत. अधिकारी तब्बल रात्री 10 वाजता घटनास्थळी पोहोचले. तरी वन विभाग आणि हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना चांगली समज द्यावी. तसेच सदाशिवनगर फर्स्ट मेन, फर्स्ट क्रॉस येथील महाराष्ट्र बँकेसमोरील झाड लवकरात लवकर तोडावे आणि भविष्यात मोठी आपत्ती होण्यापासून रोखावे, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.