बेळगाव लाईव्ह :मोकाट गायींशी संबंधित शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मदत करण्याचे प्रशंसनीय कार्य यंग बेळगाव फाउंडेशनने केले असून ज्यामुळे संबंधित दोन गाईंना जणू जीवदानच मिळाले आहे.
कॅम्प परिसरातील स्थानिकांकडून काल दुपारी यंग बेळगाव फाउंडेशन टीमला फोन आला की गेल्या दोन दिवसांपासून एक गाय अत्यंत वाईट अवस्थेत असहाय्यपणे जमिनीवर पडून आहे.
सदर माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर आणि ॲलन विजय मोरे हे त्यांच्या टीमसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी 1962 पशु रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधला आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मदतीने गायीवर उपचार सुरू केले. गाय पूर्णपणे बरी होईपर्यंत पुढील 3-4 दिवस उपचार सुरू राहण्याची अपेक्षा आहे.
सदर घटनेनंतर संध्याकाळी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरकडून आणखी एक फोन आला, जिथे एक गाय कार अपघातात जखमी झाल्याचे सांगण्यात आले. तेंव्हा यंग बेळगाव फाउंडेशनच्या टीम पुन्हा तोऱ्याने घटनास्थळी पोहोचली.
त्या ठिकाणी देखील 1962 पशु रुग्णवाहिका मागून संबंधित असहाय्य जखमी गाईवर वेळेवर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले.
या पद्धतीने दोन असह्य गाईंना यंग बेळगाव फाउंडेशनने ज्या पद्धतीने जलद हालचाल करून वेळेवर उपचार उपलब्ध करून दिले, त्याबद्दल परिसरातील रहिवाशांमध्ये त्यांचे कौतुक होत होते.