बेळगाव लाईव्ह :शाहूनगर येथे बुडाकडून विकसित केलेल्या उद्यानाच्या देखभालीकडे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे झाडे -झुडपे, रान वाढण्याबरोबरच आसपासच्या गटारींचे सांडपाणी शिरून या उद्यानाची दुर्दशा झाली आहे. तरी या उद्यानाचा चांगल्या प्रकारे विकास साधून ते लवकरात लवकर जनतेसाठी खुली करावे, अशी जोरदार मागणी समस्त शाहूनगरवासियांकडून केली जात आहे.
शाहूनगर येथील उद्यान जे पावसाळा आणि हिवाळ्यात हिरवळीने सजवले जाणार होते मात्र त्याची सध्या देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. शाहुनगर परिसरातील बहुतेक उद्याने जीर्ण अवस्थेत असून त्यापैकीच हे एक उद्यान आहे. अयोग्य देखभालीमुळे उद्यानाच्या परिसरात झाडे -झुडपे आणि गवताचे रान वाढले असून पावसाचे पाणी साचून दुर्गंधी येत आहे.
याला कारण स्थानिक रहिवाशांकडून उद्यान परिसरात टाकला जाणारा कचरा हे आहे. सदर उद्यानाला अस्वच्छ बकाल स्वरूप प्राप्त झाल्यामुळे सुट्टीच्या दिवशी कुटुंबवत्सल नागरिकांना आपल्या कुटुंबियांसोबत या ठिकाणी निवांत वेळ घालवणे कठीण झाले आहे. पावसाच्या आणि गटारीच्या साचलेल्या पाण्यामुळे या उद्यानात नाक मुठीत धरून वावरावे लागत आहे. देखभाली अभावी उद्यानातील बगीचा नष्ट झाला आहे.
गेल्या चार वर्षांपासून बेळगाव शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडाकडून हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. परंतु गटाराचे पाणी आणि सांडपाण्याचे पाणी उद्यानात येत असल्याने नागरिकांना आजारांचा सामना करावा लागत आहे. बुडा अथवा महापालिकेकडून या उद्यानाची चांगल्या प्रकारे देखभाल होणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तसेच बुडा आणि महापालिकेने माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेले या उद्यानाचे विकास काम युद्धपातळीवर पूर्ण करून उद्यानाची चांगल्या प्रकारे देखभाल करावी, अशी जोरदार मागणी समस्त शाहूनगरवासियांकडून केली जात आहे.
या संदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आदित्य पाटील म्हणाले की, शाहूनगर, विनायक कॉलनी येथे असलेले हे उद्यान या भागातील सर्वात मोठे उद्यान आहे. माजी आमदार अनिल बेनके आणि रेश्मा प्रवीण पाटील यांच्या प्रयत्नामुळे हे उद्यान अस्तित्वात आले आहे. मात्र सध्या देखभाली अभावी आसपासच्या गटारी व नाल्याचे सांडपाणी या उद्यानात शिरत आहे.
त्यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरण्याबरोबरच डास, माशांचा प्रादुर्भाव वाढवून परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सदर उद्यान हे बेळगाव महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले असल्याचे बुडाकडून सांगितले जात असल्यामुळे आमची महापालिकेला विनंती आहे की या उद्यानामध्ये उद्भवलेल्या समस्यांचे निवारण करून या उद्यानाची चांगली देखभाल केली जावी.
अस्वच्छ वातावरणामुळे नागरिक आणि युवकांना या ठिकाणच्या वॉकिंग स्ट्रीट व ओपन जिमचा सदुपयोग करणे कठीण झाले आहे. तरी महापालिकेच्या कर्तव्यदक्ष आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील गटारी व नाल्याची साफसफाई करून त्यांची दुरुस्ती करावी. बेळगाव उत्तरच्या आमदारांनी देखील या उद्यानाच्या उत्कर्षासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच या उद्यानाचा लवकरात लवकर चांगल्या प्रकारे विकास करून ते जनतेसाठी अधिकृतरित्या खुले करण्यात यावे, अशी मागणी आदित्य पाटील यांनी केली.


