बेळगाव लाईव्ह : परिस्थिती कितीही कठीण असली, जिद्द आणि मेहनत असेल तर यश नक्की मिळतं – हे खरं करून दाखवलंय खानापूर तालुक्यातील एका विद्यार्थिनीने. अत्यंत दुर्गम भागातून, जंगलात वसलेल्या घोसे गावातील सविता मिराशी हिने दहावी आणि बारावीमध्ये मिळवलेल्या गुणांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
खानापूर तालुक्यातील घोसे हे गाव. आजही घनदाट जंगलात वसलेलं, अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित असलेलं. अशा ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबातील सविता मिराशी या विद्यार्थिनीने परिस्थितीवर मात करत ज्ञानाचा प्रकाश शोधला. दहावीच्या परीक्षेत तिने तब्बल ८७ टक्के, आणि नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात ९१.५१ टक्के गुण मिळवत तिच्या जिद्दीचं मोठं उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं आहे.
सविता मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर या संस्थेची विद्यार्थिनी असून अभ्यासासाठी लागणाऱ्या सुविधा मर्यादित, वीज आणि इंटरनेट सारख्या गोष्टी आजही नियमित नसलेल्या भागात सविताने आपल्या कष्टाच्या बळावर हे यश मिळवलं.
या दोन्ही बहिणीही अभ्यासात तितक्याच हुशार आहेत, आणि घरात शिक्षणाला दिलं जाणारं प्राधान्यच त्यांच्या यशामागचं खरं कारण आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, जर मेहनतीला साथ असेल आणि आपल्यावर विश्वास असेल, तर यश काही थांबत नाही याच धारणेतून तिने हे यश संपादन केलं आहे.
सविताचं हे यश आज अनेक ग्रामीण भागातील मुलींना नवी उमेद देणारं ठरत आहे. शासन, समाज आणि पालकांनी अशा मुलींना प्रोत्साहन दिलं, तर घोसेसारख्या गावांमधूनही अनेक उच्चपदस्थ, अधिकारी घडू शकतात हे निश्चित!