बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील धामणे गावात शेतात काम करणाऱ्या एका वृद्ध महिलेवर दुसऱ्या महिलेने जीवघेणा हल्ला करून तिची कर्णफुले हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हल्लेखोर महिला सध्या फरार असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धामणे गावाजवळ शेतात काम करत असलेल्या विमलाबाई बाळेकुंद्री (वय ६०) या वृद्ध महिलेवर एका अनोळखी महिलेनं हल्ला करून त्यांच्या कानातील सोन्याची कर्णफुले हिसकावली. ही महिला चेहरा कापडाने झाकून, थेट शेतात आली होती अशी माहिती वृद्ध महिलेने दिली आहे.
नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतात काम करत असताना विमलाबाईंवर पाठून हल्ला करण्यात आला. आरोपी महिलेने काठीने त्यांच्या डोक्यावर जबरदस्त प्रहार केला आणि बेशुद्ध अवस्थेत असताना कर्णफुले हिसकावून तिथून पळ काढला.
गंभीर जखमी झालेल्या विमलाबाईंनी कसाबसा स्वतःला रस्त्यापर्यंत ओढत नेलं. तेथे उपस्थित नागरिकांच्या मदतीने त्यांनी आपल्या नातेवाइकांना संपर्क साधला. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले असून सध्या बेळगावच्या बीम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, महिलेकडूनच महिलेवर असा हल्ला झाला असल्याने स्थानिक नागरिकही थक्क झाले आहेत. पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.