बेळगाव लाईव्ह :गेल्या कांही दिवसांपासून उष्णतेत वाढ होत असून बेळगाव शहराचे शहराचे कमाल तापमान आज आज शनिवारी 35.7 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे दिवसभर प्रचंड उष्मा जाणवत होता.
वास्तविक महाशिवरात्रीनंतर बेळगाव सह राज्यात उन्हाळा सुरू होत असतो तथापि यंदा पंधरा दिवस ते तीन आठवडे आधीच उष्मा जाणवत आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण होऊ लागले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी बेळगाव शहराचे 32 ते 33 अंश सेल्सिअस इतके होते ते आज शनिवारी किमान 20.4 अंश सेल्सिअस आणि कमाल तब्बल 35.7 अंश सेल्सिअस इतके झाले होते. त्यामुळे अंगाची काहिली होऊन घराबाहेर पडलेल्यांच्या अंगावर घामाच्या धारा लागत आहेत.
उष्मा वाढल्यामुळे नागरिकांनी गारव्यासाठी घर आणि कार्यालयांमध्ये एसी व पंखे सतत चालू ठेवणे पसंत केले आहे. वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत शीतपेय आणि रसाळ फळांची मागणी वाढली आहे.
दरम्यान अलीकडच्या काळात विकास कामांच्या नावाखाली तसेच टोलेजंग अपार्टमेंट सारख्या इमारती उभारण्यासाठी शहरातील झाडांची बेसुमार कत्तल करण्यात आल्यामुळे उष्म्यामध्ये बेसुमार वाढ पाणीटंचाई वगैरे समस्या निर्माण होत असल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे.
सध्याच्या वाढत्या उष्म्याबद्दल सोशल मीडियावर देखील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. उत्तम केलं बेळगाव.. आपण एक छान छोटे शहरी उष्ण बेट तयार केले असून ज्याला आपण स्मार्ट सिटी समजत आहोत. अजूनही वेळ गेलेले नाही पुढील पाच वर्षे जर आपण यावर काम करू तर आशा आहे की उष्म्याची ही समस्या आपण निकालात काढू शकू. या कामासाठी कोणी सहकार्य करू इच्छित असेल तर कृपया आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पर्यावरणप्रेमी समीर मजली यांनी सोशल मीडियावर केले आहे.
फेब्रुवारीत ही स्थिती असेल तर विचार करा मार्चमध्ये काय परिस्थिती होईल. एप्रिल आणि मे मध्ये तर काय होईल कोण जाणे, असे एका नेटकऱ्याने म्हंटले आहे. स्वतंत्र घरांचे बिल्डरांच्या बहुमजली इमारतीमध्ये रूपांतर ही शहरासाठी येत्या 5 वर्षातील मोठी समस्या ठरणार आहे. अतिशय उत्तम यावर्षी पाण्याची टंचाई निर्माण होणार हे निश्चित वगैरे प्रतिक्रिया नेटकर्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.