Monday, February 10, 2025

/

रोटरी’ साउथतर्फे 11 पासून शिवकालीन भव्य शस्त्र, रांगोळी प्रदर्शन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथतर्फे येत्या सोमवार दि. 11 ते शुक्रवार दि. 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत भव्य अशा शिवकालीन शस्त्र प्रदर्शनासह मराठा आरमार व शिवकालीन प्रसंगांवर आधारित रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी सुमारे 8 ते 10 लाख रुपये खर्च केले जाणार असून उद्घाटनादिवशी शहरात शिवकालीन वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथचे इव्हेंट चेअरमन रो. अशोक नाईक यांनी दिली.

शहरात आज रविवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. इव्हेंट चेअरमन रो. नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर शिवकालीन शस्त्र व रांगोळी प्रदर्शन रेल्वे ओवर ब्रिज जवळ येईल मराठा मंदिर येथे सकाळी 10 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत भरवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजचे विद्यार्थी विसरत चालले आहेत. हा इतिहास त्यांनी विसरू नये, महाराजांच्या इतिहासाची, त्यांच्या गनिमी काव्यांची, दूरदृष्टीची आणि शरीराने बलदंड असलेले त्यांचे सरदार मावळे हे कशाप्रकारे तत्कालीन शस्त्र हाताळत होते, याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना राहावी या उद्देशाने हे शस्त्र प्रदर्शन भरवण्यात येत आहे. प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपतींच्या काळात त्यांच्या सरदार आणि मावळ्यांनी वापरलेली शस्त्रे त्यांच्या सध्याच्या वंशजांनी जतन करून ठेवली आहेत. येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक हे स्वतः येसाजी यांनी ज्या तलवारीने हत्तीची सोंड एका वारात उडवली होती ती तलवार घेऊन येणार आहेत. जी प्रदर्शनामध्ये सर्वांना पाहायला मिळेल. तसेच शिवकालीन अनेक सरदार घराण्याचा या प्रदर्शनात सहभाग असणार आहे. सरदार विक्रमसिंह मोहिते, सरदार यशराजे घोरपडे, सरदार मेघराज शिंदे आणि सरदार श्री बाजीप्रभू देशपांडे यांच्या घराण्याचे वंशज त्यापैकी प्रमुख आहेत. सरदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सरदार ओमकरराजे मालुसरे आणि शीतलताई मालुसरे हे उभयता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी कवड्याची माळ सरदार तानाजी मालुसरे यांना अर्पण केली होती ती माळ घेऊन प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत. सदर बहुमोल कवळ्याची माळ हे देखील या प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे.

शस्त्र प्रदर्शनाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदार आणि मावळ्यांच्या जीवनावर आधारित विविध प्रकारच्या रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक रांगोळ्या काढण्यासाठी कलाकारांना सुमारे 36 ते 40 तासाचा कालावधी लागणार आहे. रांगोळी प्रदर्शनातील रांगोळ्या रेखाटण्यासाठी नासिक येथील साई आर्ट्सचे जवळपास 15 कलाकार बेळगावात दाखल होत असून आज रात्रीपासूनच रांगोळी रेखाटनेचे काम सुरू होणार आहे.

सदर शस्त्र व रांगोळी प्रदर्शनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत त्यामध्ये वेशभूषा, सांघिक पथनाट्य आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ व महिला मंडळ यांच्यासाठी खुल्या गटाची नाट्य स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यासाठी आकर्षक रोख रकमेची पारितोषिके व चषक पुरस्कृत करण्यात आले आहेत. सदर प्रदर्शनाला बेळगाव शहरातील दानशूर व्यक्ती व संस्थांचे आर्थिक सहाय्य लाभले असून त्यामध्ये लोकमान्य सोसायटी, पीव्हीजी उद्योग समूह पीएनजी उद्योग समूह, बिर्ला स्कूल, चैतन्य इन्स्टिट्यूट, स्मार्ट इन्व्हेस्टमेंटचे सचिन सांबरेकर, श्रीराम सेनेचे सचिन हंगिरकर, उद्योगपती शिरीष गोगटे आदींचा समावेश आहे.Rotary

प्रदर्शनाच्या उद्घाटनादिवशी येत्या मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता शहरात शिवकालीन वातावरण निर्माण व्हावे यासाठी गोवावेस जलतरण तलावापासून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर होणाऱ्या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास उद्घाटक म्हणून एमएलआयआरसी बेळगावचे कमांडंट ब्रिगेडियर जाॅयदीप मुखर्जी आणि प्रमुख पाहुणे म्हणून सरदार विक्रम सिंह मोहिते उपस्थित राहणार आहेत.

सदर शिवकालीन शस्त्र आणि रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यासाठी सुमारे 8 ते 10 लाख रुपये खर्च येणार आहे. ते प्रदर्शन शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत असणारा असून जनतेसाठी मापक प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे, अशी माहिती इव्हेंट चेअरमन अशोक नाईक यांनी दिली. पत्रकार परिषदेस रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथचे अध्यक्ष रो. निलेश पाटील, सेक्रेटरी रो. भूषण मोहिरे, रो. गोविंद मिसाळे व रो. मनोज सुतार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.