बेळगाव लाईव्ह : शुक्रवारी सुळेभावी बसमध्ये बाळेकुंद्री येथे घडलेल्या बसमधील वादावादीच्या प्रकारानंतर या घटनेला भाषिक वादाचा रंग देण्यात येत असून या घटनेनंतर कर्नाटक परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांनी कंडक्टरला पाठिंबा दर्शवला आहे. आज त्यांनी जिल्हा रुग्णालयात बस कंडक्टरची भेट घेऊन विचारपूस केली.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, फक्त परिवहन विभाग नव्हे, तर संपूर्ण समाज या कंडक्टरच्या पाठीशी आहे. बस कंडक्टरवर दाखल केलेला पॉक्सो कायद्याचा गुन्हा चुकीचा आहे.
सीमाभागात घडलेल्या घटनेनंतर महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले. यादरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाने केलेल्या आंदोलनावर बोलताना रामलिंग रेड्डी म्हणाले, शिवसेनेसारख्या पक्षाने अशा लहान वादात पडू नये, दोन राज्यात सौहार्दता आणण्यासाठी शिवसेनेने गप्प राहायला हवे.
सदर बस कंडक्टर तंदुरुस्त झाला असून पॉक्सो गुन्हा दाखल झाल्यामुळे बेचैन झाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्यावर पोलिसांनी केलेली कारवाई योग्य असल्याचेही ते म्हणाले.
या प्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशा घटना समाजाच्या शांततेला बाधा आणणाऱ्या आहेत आणि अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकार सर्व आवश्यक उपाययोजना करेल.
याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई केली असून आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर दोन्ही राज्यातील वातावरण तणावपूर्ण बनले असून दोन्ही राज्यातील परिवहनचे नुकसान झाले आहे. शिवाय बससेवेवरही परिणाम झाल्याचे ते म्हणाले.