बेळगाव लाईव्ह :विजयनगर, हालगा येथे तीन गवत गंजींना आग लागून सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली.
आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या गवतगंज ही स्थानिक शेतकरी नागाप्पा पायाक्का यांच्या मालकीच्या होत्या. गवत गंजींना आग लागल्याचे निदर्शनास येताच आसपासच्या शेतकरी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच जळणाऱ्या गंजींमधील आगीची धग न लागलेले गवत त्वरेने सुरक्षित अंतरावर साठवण्यास सुरुवात केले.
त्यामुळे नुकसानीचा आकडा कमी होण्यास मदत झाली. आगीची माहिती लागलीच अग्निशामक दलाला देण्यात आली, मात्र घटनास्थळी पोहोचण्यास त्यांना अर्धा तास लागल्यामुळे तोपर्यंत तीन गंज्या आगीत भस्मसात झाल्या होत्या.
बेचिराख झालेल्या गंज्यांमध्ये दोन ट्रॅक्टर कडबा, दोन ट्रॅक्टर करड आणि दोन ट्रॅक्टर वाळलेले गवत असल्यामुळे शेतकरी नागाप्पा पायाक्का यांचे सुमारे 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक आसपास कोणी नसल्याचे पाहून आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गंजींना आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.