बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने ई-खात्यासाठी उपाययोजना आखण्यास सुरवात केली आहे. सोमवारीपासून (दि. 24) कुमारगंधर्व रंगमंदिर येथे एक भव्य ई-खाता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात सहभागी होऊन लोकांनी ए आणि बी खाता मिळविण्यासाठी कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आह.
बंगळूर येथील महापालिका संचलनालयाच्या संचालकांनी 17 फेब्रुवारी 2025 रोजी ई-एसी सॉफ्टवेअरद्वारे ई-खाता जारी करण्याचे प्रमाणपत्र जारी केले आहे. त्यानुसार, राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारक्षेत्रातील ई-खात्यांसाठी प्रलंबित असलेल्या सर्व मालमत्तांना 3 महिन्यांच्या आत ई-खाते प्रदान करण्याच्या सूचना केल्या आहेत.
ए रजिस्टरमध्ये नोंदणीकृत मालमत्तांसाठी ई-खाता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मालमत्तेची मालकी सिद्ध करणार्या मालमत्तेसंदर्भात महसूल विभागाने जारी केलेले नोंदणीकृत विक्रीपत्रे, देणगीपत्रे, विभाजनपत्रे, सरकार किंवा सरकारी महामंडळांनी जारी केलेले हक्क, मंजुरीपत्रे, 94 सी.सी. अंतर्गत जारी केलेले दाव्याचे पत्र सादर करण्यात यावे, असे कळवले आहे.
तर संबंधित अधिकार्यांकडून मिळालेल्या मंजुरीची प्रमाणित प्रत आणि जागेचे रिलीज लेटर, चालू वर्षापर्यंतचे कर्ज प्रमाणपत्र, चालू वर्षासाठी मालमत्ता कर भरण्याची पावती, मालकाचा फोटो आणि मालमत्तेचा फोटो आणि मालकाच्या ओळखपत्राची प्रत सादर करणे आवश्यक आहे, असेही सांगितले आहे.
बी रजिस्टरमध्ये नोंदणीकृत मालमत्तांसाठी ई-खाता जारी करण्यासाठी मालमत्तेच्या संदर्भात नोंदणीकृत विक्रीपत्रे, देणगीपत्रे, विभाजनपत्रे, क्लिअरन्सपत्रे, चालू वर्षापर्यंतचे कर्ज प्रमाणपत्र, चालू वर्षाची मालमत्ता कर भरण्याची पावती, मालकाचा फोटो आणि मालमत्ता मालकाचा फोटो ही आवश्यक कागदपत्रे आहेत, असे महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी कळवले आहे.