बेळगाव लाईव्ह : दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून सीमाप्रश्नी ठराव मांडावा तसेच महाराष्ट्र सरकारने ६० वर्षांहुन अधिक काळ प्रलंबित असणारा सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवावा असे आवाहन केले.
संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर भाषणासाठी उभे राहताच सभागृहामध्ये काही जणांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. बेळगाव, बीदर, भालकी आणि कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा लिहिलेल्या टोप्या त्यांनी परिधान केल्या होत्या.
संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणाबाजीबद्दल बोलताना साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, मी भाषणाला उभे राहिल्यावर घोषणाबाजी करण्यात आली. या लोकांनी मला संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासंबंधीचे पत्रदेखील दिले आहे. माझी शासनाला विनंती आहे की, सीमा प्रश्न शासनाने लवकरात लवकर सोडवावा. सीमा प्रदेशांमध्ये भाषिक आणि सांस्कृतिक समरसता आहे. बेळगावला कित्येक घरी अशी आहेत ज्यामध्ये दोन्ही भाषा अतिशय चांगल्या बोलल्या जातात. महाराष्ट्रात अनेक शाळा किंवा अनेक घरे अशी आहेत जिथे कन्नड आणि मराठी दोन्ही भाषा चांगल्या बोलल्या जातात. ही गोष्ट संत काळापासून आहे. इसवी सनाच्या 13 व्या आणि 14 व्या काळापासून आहे. कानडी आणि मराठी यांच्यात संबंध अगोदरपासूनच आहेत, असे भवाळकर म्हणाल्या.
सांगली येथे झालेल्या एका कार्यक्रमात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती शिष्टमंडळाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांच्यासमवेत विशेष बैठक घेऊन दिल्ली येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात सीमाप्रश्नासंबंधित ठराव घेण्याचा आग्रह केला होता. तसेच 23 डिसेंबर 2024 रोजी या संदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेला पत्र पाठविण्यात आले होते.
1959 साली दिल्लीतील साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव झाला होता. यानुसार दिल्लीतील संमेलनात “वादग्रस्त सीमा भाग महाराष्ट्रात सामील करण्यात यावा” असा ठराव मंजूर करण्याची मागणी करण्यात आली होती.
या मागणीची आणि समिती शिष्टमंडळाने सादर केलेल्या पात्राची दखल घेत डॉ. तारा भवाळकर यांनी अ. भा. साहित्य संमेलनात सीमाप्रश्नी ठराव मांडण्याची सूचना केली. लवकरात लवकर सीमाप्रश्न सुटावा यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, सीमाप्रदेशातील मराठी भाषा कमी होत चालली आहे हि बाब अत्यंत दुःखदायक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.