बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत केवळ चार दिवसांत ४६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याचा आरोप झाल्यानंतर महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
प्रशासनाच्या सुधारणेसाठी आणि कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या बदल्या नियमबाह्य नसून, सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पाडल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बेळगाव महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरून वाद निर्माण झाल्यानंतर महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाचे समर्थन केले. त्यांनी सांगितले की, १५ नोव्हेंबर २०२४ रोजी अंतर्गत नियोजनाअंतर्गत ४६ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली.
त्यापैकी २६ कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागातच अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली असून, उर्वरित २० जणांना एकाच इमारतीतील वेगवेगळ्या शाखांमध्ये स्थानांतरित करण्यात आले आहे.
या बदल्यांमागे कोणताही गैरव्यवहार नाही. प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या काही विभागांमध्ये गेली अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. विशेषतः ट्रेड लायसन्स विभागात अधिक कार्यक्षमतेसाठी काही आरोग्य निरीक्षकांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.
आरोग्य विभागासमोर अनेक महत्त्वाची आव्हाने उभी असल्याने कार्यप्रवाह सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेतील प्रशासकीय सुधारणा आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने या बदल्या करण्यात आल्याचे आयुक्त शुभा बी. यांनी स्पष्ट केले आहे.