बेळगाव लाईव्ह: कर्नाटक हद्दीतील पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील चित्रदुर्ग येथे कन्नड येते का? असे विचारत महाराष्ट्राच्या एसटी चालकाला आणि एसटी बसला कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी करत काळे फासल्याची संतापजनक घटना काल शुक्रवारी रात्री घडली. आता या घटनेची पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता आहे.
याबाबतची माहिती अशी की, काल शुक्रवारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बेंगलोर -मुंबई एसटी (क्र. एमएच 14 केक्यू 7714) ही बस घेऊन एसटी चालक भास्कर जाधव चित्रदुर्ग येथून कोल्हापूरच्या दिशेने येत होते. त्यावेळी चित्रदुर्ग येथे रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास महामार्गावर कन्नड रक्षण वेदिकेच्या (करवे) कार्यकर्त्यांनी एसटी अचानक अडवली. तसेच चालकास कन्नड येतं का अशी विचारणा केली कन्नड येत नसल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी चालक जाधव यांना जबरदस्तीने एसटीतून खाली उतरवले.
तसेच अरेरावी करून त्यांच्या तोंडाला काळे फासत “कन्नड येत नसेल तर कर्नाटकात येऊ देणार नाही”, अशी जोरदार घोषणाबाजी करू लागले. यावेळी करवेच्या गुंडांनी एसटी बसला देखील काळे फासले. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्रातून एसटी अधिकारी चित्रदुर्गच्या दिशेने रवाना झाले असून आज शनिवारी ती एसटी महाराष्ट्रात आणली जात आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद गेल्या अनेक वर्षापासून भिजत पडला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून अन्याय अत्याचार करण्याबरोबरच कन्नड भाषेची सक्ती केली जाते. सरकार आणि पोलीस खात्याच्या जीवावर याचा कन्नड रक्षण वेदिकेसारख्या कानडी संघटना मराठी भाषिकांना डिवचण्याचा, त्यांची कुरापत काढण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. दुसरीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि भाषावाद यामध्ये कोणतीही घटना घडली की पहिले टार्गेट महाराष्ट्रातील एसटी गाड्या होतात.
काल देखील तोच प्रकार घडल्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून आम्हाला सुरक्षा मिळाली नाही तर आम्ही कर्नाटकात गाड्या घेऊन जाणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. शिवाय आता कालच्या घटनेची पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची आणि महाराष्ट्र -कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चित्रदुर्ग येथील घटनेबद्दल कोल्हापूरसह बेळगाव सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.