‘मराठी’च्या काविळीमुळे कन्नड संघटनांना नैतिकतेचा विसर

0
2
 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगावच्या बाळेकुंद्री खुर्द येथे बसमधील युवतीला शिवीगाळ करणाऱ्या बस कंडक्टरला स्थानिक नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला. मात्र, त्याने भाषिक वादाचा रंग देत आपल्याला मराठी भाषिकांनी मारहाण केल्याचा खोटा आरोप केला. या संपूर्ण प्रकारानंतर कंडक्टरवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र या घडलेल्या घटनेचा कन्नड संघटनेच्या तथाकथित मूठभर कार्यकर्त्यांकडून राजकारणासाठी वापर केला गेला. कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांमुळे सध्या बेळगाव सीमाभागासह संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्रातील वातावरण गढूळ बनले आहे. कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सदसदविवेकबुद्धी गहाण टाकून, नैतिकता बाजूला सारून घेतलेल्या मूर्खपणाच्या पवित्र्यामुळे एका वादावादीच्या प्रसंगातून घडलेल्या घटनेचे पडसाद विचित्र पद्धतीने उमटू लागले आहेत.

बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द येथे एका युवतीने प्रवासादरम्यान बस कंडक्टरकडे मराठीत तिकीट मागितले. मात्र, कंडक्टरने कन्नडमध्ये बोलण्याचा आग्रह धरत युवतीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. “कन्नड येत नसेल तर कर्नाटकात का राहतेस?” असे म्हणत त्याने हुज्जत घातली. ही माहिती युवतीने पालकांना कळवताच, गावात बस येताच नागरिकांनी कंडक्टरला जाब विचारला आणि चोप दिला. त्यानंतर कंडक्टरने आपली चूक झाकण्यासाठी भाषिक वादाचा कांगावा करत, मराठी भाषिकांनी मारहाण केल्याचा खोटा आरोप केला. मात्र, बाळेकुंद्री खुर्द गावात कोणताही भाषिक वाद नसल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले. प्रत्यक्षात हा वाद भाषेचा नसून कंडक्टरच्या वर्तनाचा असल्याचे स्पष्ट झाले. बस कंडक्टरचे वय, हुद्दा पाहता आपल्या कामाशी प्रामाणिक राहून त्याने वागणे रास्त होते. मात्र उर्मट पद्धतीने वागणूक असल्याने तसेच स्वतःची चूक असूनही कंडक्टरने याला भाषिक वादाचा रंग देण्याचा प्रयत्न केल्याने या घटनेनंतर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र परिवहनची बस रोखत, बसचालकाला कन्नड येते का, अशी विचारणा केली. जेव्हा त्याने नकार दिला, तेव्हा त्याला काळे फासण्यात आले. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले असून, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक परिवहनच्या बस रोखून निषेध नोंदवला. दरम्यान, या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला असून युवतीने मारिहाळ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार कंडक्टर महादेवप्पाने बसमध्ये तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

 belgaum

या संपूर्ण प्रकारावर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “घटनेला भाषिक वादाचा रंग देण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांकडून केला जात आहे. कन्नड संघटनांचे कार्यकर्ते समाजाला लागलेली कीड असून, त्यांच्या भूमिकेवरून ते अशा घटनांना पाठिंबा देतात, असे स्पष्ट होत आहे. अशा नालायक लोकांना वाव देण्याचे काम कन्नड संघटना करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा प्रकार इथेच थांबवावा. घडल्या प्रकारची शहानिशा करून योग्य ती भूमिका घ्यावी, न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस विभाग कार्यरत असल्याचे ते म्हणाले.State

याचप्रमाणे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बणियांग यांनीही यावर प्रतिक्रिया देत या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजूंनी तक्रारी स्वीकारल्या असून, आता प्रत्यक्षदर्शी प्रवाशांकडून अधिक माहिती घेतली जात आहे. बस कंडक्टरने अयोग्य वर्तन केल्याच्या तक्रारीवरून बस कंडक्टरवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, सत्य शोधण्यासाठी आम्ही सखोल तपास करत आहोत. घटनेच्या वेळी बसमध्ये असलेल्या इतर प्रवाशांचे जबाब नोंदवले जात आहेत. सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी सीमावर्ती भागातील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे, असे स्पष्ट केले.

एकंदर प्रकार पाहता बसमध्ये घडलेल्या प्रकारानंतर कंडक्टरने वळविलेला विषय, कन्नड संघटनांनी चुकीच्या पद्धतीने मांडलेली भूमिका आणि यावरून खवळलेले वातावरण पाहता सीमाप्रश्न आणि मराठी भाषिकांविषयी कन्नड संघटनांना असलेला आकस लक्षात येतो. घटनेचा तपशील पाहता एका तरुणीसोबत झालेला विनयभंगासारखा प्रकार, अल्पवयीन मुलीसोबत आकसापोटी एका ज्येष्ठ वयाच्या बसचालकाने घातलेला अर्वाच्च शब्दातील वाद पाहता याठिकाणी जात, पात, भाषा असे विषय गौण मानून तरुणीच्या बाजूने प्रत्येकाने उभे राहून न्याय मिळवून देणे गरजेचे होते. मात्र याउलट ती तरुणी केवळ मराठी भाषिक आहे या एका कारणास्तव चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालण्याचे काम कन्नड संघटनांनी केले, हि बाब अत्यंत घृणास्पद आहे. सीमाप्रश्नी आणि मराठी भाषेच्या विषयावरून नेहमीच कन्नड संघटनांनी पोटशूळ व्यक्त केला आहे. मात्र सीमाभागात घडलेल्या प्रकारानंतर कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांची वृत्तीच नाही तर नीतिमत्ता आणि सदसदविवेकबुद्धी देखील किती खालच्या पातळीची आहे, हे सिद्ध होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.