बेळगाव लाईव्ह :गुलमोहर बाग या बेळगावच्या कलाकारांच्या संघातर्फे येत्या रविवार दि. 26 ते गुरुवार दि. 30 जानेवारी 2025 या कालावधीत दररोज सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत ‘फोर स्क्वेअर्स’ या पेंटिंग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे .
टिळकवाडी येथील हेरवाडकर हायस्कूल जवळील वरेकर नाट्य संघाच्या कला महर्षी के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी येथे हे प्रदर्शन भरणार आहे.
हे विचारपूर्वक क्युरेट केलेले प्रदर्शन प्रत्येक सहभागी कलाकाराच्या चार 12×12 पेंटिंगसह, टोन आणि थीमचा एकसंध अनुभव देणारे असणार आहे. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी 26 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता प्रमुख पाहुणे प्रसिद्ध पर्यावरणवादी कॅप्टन नितीन धोंड, प्रसिद्ध कलाकार दिनेश रेवणकर आणि विक्रांत शितोळे यांच्या हस्ते होणार आहे.
सदर प्रदर्शनात गुलमोहर बागच्या 34 कलाकारांची पेंटिंग्स मांडण्यात येणार आहेत. नवोदित कलाकारांसह कलाप्रेमींचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी सलग पाच दिवस चालणाऱ्या ‘फोर स्क्वेअर्स’ प्रदर्शनाच्या प्रत्येक दिवशी कला आणि संकल्पनांवर संवादात्मक प्रात्यक्षिके आयोजित केली जाणार आहेत.
उद्घाटनादिवशी सायंकाळी 4 वाजता मुंबईचे कलाकार विक्रांत शितोळे हे वॉटर कलर पेंटिंगचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. त्याचप्रमाणे दि. 27 रोजी दिनेश रेवणकर (इन्स्टंट स्केचिंग), दि. 28 रोजी शिल्पा खडकभावी (ॲबस्ट्रेक्ट लँडस्केप इन ऍक्रेलिक), दि. 29 रोजी सुजाता वस्त्रद (म्युरल आर्ट) आणि शेवटच्या दिवशी दि. 30 जानेवारी रोजी शौरीका गरगट्टी (न्यूरो माईंडस्केप) यांची प्रात्यक्षिके सादर होणार आहेत.
ही सर्व प्रात्यक्षिके त्या त्या दिवशी सायंकाळी 5 वाजता सादर केली जातील. या अनोख्या आणि तल्लीन करणाऱ्या अनुभवासाठी नवोदित कलाकारांसह कलाप्रेमी आणि संग्राहकांनी “फोर स्क्वेअर्स” कला प्रदर्शनाला बहुसंख्येने आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजक गुलमोहर बाग संघातर्फे करण्यात आले आहे.