बेळगाव लाईव्ह :कुटुंबीयांनी वाऱ्यावर सोडल्यामुळे असहाय्य जखमी अवस्थेत रस्त्या शेजारी बसलेल्या एका इसमाला श्रीराम सेना हिंदुस्थान आणि यंग बेळगाव फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करून दिलासा दिला.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौक येथील वनिता विद्यालय शाळेजवळ आज शनिवारी सकाळी डाव्या पायाला जखम होऊन त्यात अळ्या पडलेल्या गंभीर अवस्थेत असह्य वेदना सहन करत एक इसम रस्त्याशेजारी बसला होता.
त्याची अवस्था पाहून रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांपैकी एकाने तातडीने श्रीराम सेना हिंदुस्थान आणि यंग बेळगाव फाउंडेशनच्या बचाव पथकांना माहिती दिली.
माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका मागून त्या इसमाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले. तसेच संसर्ग झालेला पाय धोकादायक स्थितीत असल्यामुळे बचावकर्त्यांनी डॉक्टरांना त्याच्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि त्याचा जीव वाचवण्याची विनंती केली. दरम्यान त्या इसमाची विचारपूस केली असता आपण हिंडलगा येथील असून माझ्या कुटुंबाने मला वाऱ्यावर सोडले आहे असे त्याने दुःखाने सांगितले.
उपरोक्त मदत कार्य नारू निलजकर, ॲलन विजय मोरे आणि अवधूत तुडवेकर यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे तसेच कॅम्पचे पोलीस अधिकारी मुल्ला, त्यांचे सहकारी, रुग्णवाहिका पथक, स्थानिक रहिवासी, श्री राम सेना हिंदुस्थान आणि यंग बेळगावचे सदस्य यांच्या यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले. त्याबद्दल या सर्वांची प्रशंसा होत आहे.