Friday, December 20, 2024

/

मंत्री हेब्बाळकर यांच्या विरोधात भाजपचे तीव्र आंदोलन

 belgaum

बेळगाव  लाईव्ह :राज्यातील काँग्रेस सरकारच्या विरोधात, तसेच बेळगाव तहसीलदार कार्यालयातील अधिकारी रुद्रण्णा यडवण्णावर यांच्या आत्महत्येस महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे स्वीय सहाय्यक कारणीभूत असल्यामुळे नैतिक जबाबदारी समजून हेब्बाळकर यांनी आपल्या मंत्रीपदाचा त्वरित राजीनामा द्यावा, या मागणीसाठी बेळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे आज शहरात तीव्र आंदोलन छेडण्यात आले.

शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौकात बेळगाव शहर व जिल्हा भारतीय जनता पक्षाने आज गुरुवारी सकाळी राज्य सरकारसह महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात मोठे आंदोलन छेडले. या आंदोलनात शहर व जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ज्यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. यावेळी हातात निषेधाचे फलक घेऊन राज्यातील काँग्रेस सरकारच्या धिक्काराबरोबरच कमिशन एजंट लक्ष्मी यांचा धिक्कार असो, भ्रष्ट मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा धिक्कार असो, लक्ष्मी हेब्बाळकर हटावो बेळगाव बचाओ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी चन्नम्मा चौक दणाणून सोडला होता. मंत्री हेब्बाळकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीचीही घोषणाबाजी केली जात होती.

आंदोलन स्थळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना माजी आमदार संजय पाटील म्हणाले की, कर्नाटकातील काँग्रेसच्या सरकारने गेल्या 16 महिन्यात भ्रष्टाचाराचा कहर केला आहे. म्हैसूर येथील मुडा भ्रष्टाचार, वाल्मीकी प्राधिकार मधील भ्रष्टाचार, वक्फ बोर्डाच्या माध्यमातून लोकांची फसवणूक, त्याचबरोबर चंद्रशेखर आणि रुद्राण्णा यांच्या आत्महत्या ही गेल्या 16 महिन्यातील या काँग्रेस सरकारची उपलब्धी आहे.

कन्नडमध्ये एक म्हण आहे ‘सरकारी काम देवाचं काम’, मात्र ‘सरकारी काम देवाकडे पाठवण्याचं काम’ अशा प्रकारचे कार्य काँग्रेस सरकारकडून बेळगाव सीमाभागासह संपूर्ण कर्नाटकात केले जात आहे. बेळगाव तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना दोन-तीन दिवसांपूर्वी घडली. आता नि:पक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा असे म्हणणाऱ्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आत्महत्या घडली त्यावेळी मौन का बाळगले होते? तुमच्याच तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात ही घटना घडली, तुम्ही या तालुक्याचे मंत्री, तुम्ही लिंगायत आणि पंचमसाली समाजाच्या न्यायासाठी झगडणारे नेता म्हणून अग्रेसर असता. आत्महत्या करणारा अधिकारी हा देखील लिंगायत समाजाचा पंचमसाली कार्यकर्ता होता. एक चांगला सरकारी अधिकारी होता.Bjp protest

त्याची आत्महत्या झाल्यानंतर तुम्ही दोन दिवस गप्प बसता, मौन धरता आणि आता दोन दिवसानंतर नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी असे म्हणता. आमचा स्पष्ट आरोप आहे की तुमचे दोन दिवसाचे मौन सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी होते. त्यामुळे तुम्हाला मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही. सदर आत्महत्येच्या घटनेच्या बाबतीत आम्हाला सरकारकडूनही काही अपेक्षा नाही. कारण ते कोणत्याही प्रकारचा न्याय देणार नाही. कारण चौकशी प्रक्रिया सरकारच्या आदेशानुसार होणार असल्यामुळे न्याय मिळणार नाही हे स्पष्ट आहे.

भारतीय जनता पक्ष या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेसमोर सत्य वस्तुस्थिती ठेवण्याचे काम करत आहे. कुकर, साड्या वाटून आमदार होणं सोपं आहे. मात्र लोकांची फसवणूक करून त्यांच्या मरणाला कारणीभूत होण ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तेंव्हा थोडी जरी लाज असेल तर मंत्री हेब्बाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे परखड मत माजी आमदार संजय पाटील यांनी व्यक्त केले.

त्यावेळी बोलताना भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी बेळगाव तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शहराच्या नावाला काळीमा फासणारी आहे. तसेच आत्महत्या करणारा तो कर्मचारी आपल्या सुसाईड नोटमध्ये मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे स्वीय सहाय्यक (पीए) आणि तहसीलदार हे आपल्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे नमूद करतो. यावरून स्पष्ट होते की राज्यातील सध्याचे काँग्रेस सरकार भ्रष्ट असून या भ्रष्टाचाराला आळा बसला पाहिजे. यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे सांगून त्या जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील, असे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.