बेळगाव लाईव्ह:पुणे -बेंगळूर महामार्गावरील विकास काम पूर्ण होण्यास दिरंगाई होत असल्याने जनतेला होत असलेला त्रास व नुकसानीचा विचार करून काम पूर्ण होईपर्यंत बेळगाव ते कराड दरम्यानच्या सर्व टोल नाक्यांवरील टोल आकारणी बंद करावी, अशी विनंती बेळगावचे माजी महापौर विजय मोरे यांनी एका पत्राद्वारे केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे
मी बेळगावचा माजी महापौर या नात्याने आपणास एका गंभीर समस्येची जाणीव करून देण्यासाठी हे पत्रलेखन करीत आहे. जनतेत मिसळणारे नेते म्हणून परिचित आपणास आपण करीत असलेल्या राष्ट्रनिर्माण कार्यासाठी सर्वप्रथम शुभेच्छा. पुणे -बेंगळूर हा टप्पा वाहतूक आणि दळणवळणासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. या टप्प्यावर वाजपेयीजी यांच्या काळात सुवर्ण चतुष्कोन योजना राबविली गेली आणि खऱ्या अर्थाने दळणवळण क्षेत्रातील विकास म्हणजे काय हे आम्ही अनुभवले. आज याच विकासाला दुप्पट आणि तिप्पट दराने पुढे नेण्याचे नियोजन आपण केले आणि प्रत्यक्षात काम सुरूही झाले.
याबद्दल आपल्या दूरदृष्टीला सलाम करावा तितका कमी आहे. विकास हवा आहे आणि तो योग्य वेळेत पूर्ण होऊन त्याची फळे चाखायची असतील तर संयम ठेवावा लागतो. हे सुद्धा मान्य आहे. मात्र यातून निर्माण होत असलेल्या गंभीर मुद्द्यांवर आपल्यासारख्या दृष्ट्या राजकारण्यांचे लक्ष वेधले जावे हा उद्देश आहे.
सदर महामार्गावरील प्रामुख्याने बेळगाव- संकेश्वर-कोल्हापूर-कराड या टप्प्यावर नेहमीच गजबज असते. कर्नाटक आणि गोव्याकडून देशाकडे आणि आपसूकच संपूर्ण देशाकडून पश्चिम महाराष्ट्र्र, कर्नाटक आणि गोव्याकडे जाणाऱ्या वाहतुकीचा भार हा टप्पा सोसतो. सध्या रस्ता अनियमित, कोंडलेली रहदारी आणि एकूणच वाढत्या भारामुळे या टप्प्याचा श्वासच कोंडला आहे असे म्हणावे लागेल. अनियमित रस्ते काम आणि प्रचंड दिरंगाई यामुळे येथून वाट काढताना बेळगाव ते कोल्हापूर दरम्यान तब्बल अडीज ते तीन तास आणि पुढे वाढीव एक ते दोन तास मोजावे लागत आहेत.
विकासासाठी संयम ठेऊन वाढीव प्रवास वेळेचे नियोजनही करता येईल. मात्र वाहनांच्या चाकांचे नुकसान, खड्ड्यात बिघडणारी वाहने आणि प्रचंड प्रदूषणाचा सामना करावा लागतो आहे. दुचाकी वाहनचालकांना तर जीव मुठीत घेऊनच हा प्रवास करावा लागतोय. आता विकास करताना हे सगळे स्वाभाविक असे म्हटले तरी कितीवेळ हा त्रास सहन करावा लागणार याचे गणित अंधारात आहे. यासर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार व्हावा आणि आपण स्वतः रस्ते मार्गाने या टप्प्याचा आढावा घेऊन जनतेच्या समस्या जाणून घ्याव्यात. यासाठी मुद्दामहून बेळगावचा एक दौरा आपण करावा ही नम्र विनंती. महत्वाचे म्हणजे इतका संयम ठेऊन विकासाला पाठींबा देणाऱ्या जनतेला आश्वस्थ करण्यासाठी आणि होत असलेल्या त्रासाच्या वेदनेतून दिलासा देण्यासाठी काम पूर्ण होइतोवर बेळगाव ते कराड या टप्प्यावरील सर्व टोल नाक्यांवर टोल आकारणी थांबवावी, ही नम्र विनंती. आपण जनतेच्या मनातील भाव ओळखणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहात. आमच्या या वेदनेला नक्कीच फुंकर घालाल ही आशा बाळगतो, असा तपशील माजी महापौर विजय मोरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धाडलेल्या पत्रात नमूद आहे.