बेळगाव लाईव्ह:राज्य पुनर्रचनेवेळी सीमाभागातील मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ 1956 पासून दर 1 नोव्हेंबर रोजी आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात काळा दिन पाळून सायकल फेरी काढत असतो. त्यानुसार कुठल्याही परिस्थितीत येत्या 1 नोव्हेंबर रोजी काळ्या दिनाची निषेध सायकल फेरी ही निघणारच, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही, असा ठाम निर्धार मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केला.
दरवर्षीप्रमाणे येत्या 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून निषेध सायकल फेरी काढण्यासंदर्भात मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यानंतर माजी आमदार किणेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकी संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, आम्ही 1956 पासून 1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाहतो आणि 1 नोव्हेंबर हा कर्नाटकाचा राज्योत्सव दिन 1963 पासून सुरू करण्यात आला आहे. थोडक्यात राज्योत्सव दिनाच्या सात-आठ वर्ष आधीपासून आम्ही काळा दिन पाळतो.
सदर काळा दिन हा राज्य सरकारच्या विरोधात नसून केंद्र सरकारच्या विरोधात आहे कारण 1956 मध्ये राज्य पुनर्रचना करण्यात आली त्यावेळी बेळगाव सीमा प्रदेश मराठी भाग असताना आम्हाला महाराष्ट्रात समाविष्ट करण्याऐवजी कर्नाटकात सामील करण्यात आले. हा आमच्यावर झालेला अन्याय दूर करावा या मागणीसाठी आम्ही एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळतो आणि केंद्राच्या तत्कालीन निर्णयाचा निषेध करत असतो, असे स्पष्टीकरण आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले आणि आपलीही काही मते मांडली. तसेच मला थोडा वेळ द्या, मी विचार करून माझा निर्णय कळवतो असेही त्यांनी सांगितले आहे. तेंव्हा तुमचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला लेखी द्या अशी विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
आता जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णया आल्यानंतर आम्ही त्यावर विचार करून पुढील रूपरेषा ठरवू. मात्र कुठल्याही परिस्थितीत 1 नोव्हेंबर रोजी काळ्या दिनाची सायकल फेरी ही निघणारच, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही, असे माजी आमदार मनोहर किणेकर यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांचा समिती शिष्ट मंडळाला असा सल्ला
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, कर्नाटकात १ नोव्हेंबर रोजी राज्योत्सव साजरा केला जातो. यादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेला कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आपण या आंदोलनाला परवानगी देणार नाही. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्येची आपल्याला सहानुभूती आहे. आजवर आपल्या कार्यकाळात झालेली आंदोलने, मोर्चा, मिरवणुका यांना आपण पाठिंबा दिला आहे. परंतु राज्योत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे वादंग उद्भवू नयेत यासाठी आपण काळा दिन आणि मूक मोर्चासाठी परवानगी देणार नाही.
गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आणि ईद-ए-मिलाद मिरवणुकीबाबत जसा निर्णय घेतला गेला, त्यानुसार काळ्या दिनाची मूक निषेध फेरी देखील इतर दिवशी आयोजिण्यात यावी. लोकशाहीनुसार प्रत्येकाला आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याची परवानगी आहे. शांततेत आंदोलन करण्यासाठी माझा विरोध नाही. परंतु १ नोव्हेंबर रोजी राज्योत्सव साजरा केला जात असल्याकारणामुळे राज्योत्सव दिनाव्यतिरिक्त इतर दिवशी मिरवणुकीचे आयोजन करावे.
जिल्ह्याच्या विकासासाठी शांतता आणि सौहार्द महत्वाचा असून वादविवाद घडतील, संघर्ष होईल अशी आंदोलने नको, धार्मिक सौहार्दाच्या दृष्टिकोनातून सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी माजी आमदार मनोहर किनेकर माजी महापौर, मध्यवर्ती म. ए. समिती सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, आर एम चौगुले , संतोष मंडलिक नेताजी जाधव आदींसह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.