बेळगाव लाईव्ह :सध्याच्या पावसामुळे तुंबलेल्या गटारीचे सांडपाणी व दुर्गंधीयुक्त घाण केरकचरा मोठ्या प्रमाणात शहरातील वनिता विद्यालय हायस्कूल या शाळेच्या आवारामध्ये शिरत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी या शाळेच्या शिक्षकवृंदाने केली आहे.
गेल्या कांही वर्षांपासून दर पावसाळ्यामध्ये शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकानजीक असलेल्या वनिता विद्यालय हायस्कूलच्या आवारात तुंबलेल्या गटारीचे सांडपाणी शिरण्याचा प्रकार घडत असतो. प्लास्टिक व अन्य कचरा, दुर्गंधीयुक्त गाळ सांडपाण्यासह शाळेच्या आवारात येण्या-जाण्याच्या मार्गावरच तुंबून राहत असल्यामुळे विद्यार्थीवर्ग आणि शिक्षकांना मोठा गैरसोयीचा सामना करावा लागतो.
या खेरीज सांडपाण्यासह तुंबलेल्या घाण केरकचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढत असतो. यंदा सध्या पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे देखील हीच परिस्थिती वनिता विद्यालय हायस्कूल शाळेच्या आवारात उद्भवली होती. तथापि दरवेळी प्रमाणे शाळा व्यवस्थापनाने स्वखर्चाने कामगार लावून आज मंगळवारी सकाळी आवारात साचलेले सांडपाणी काढून टाकून आवाराची साफसफाई करून घेतली.
वेळच्यावेळी शाळेच्या आसपासच्या गटारी स्वच्छ करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचे सांगून शाळेच्या शिक्षक वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष पुरवून संबंधित गटार ताबडतोब स्वच्छ करणे वगैरे आवश्यक योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.
शाळेच्या आवारात तुंबलेल्या गटारीचे सांडपाणी व घाण शिरण्याच्या प्रकाराबद्दल बेळगाव लाईव्हशी बोलताना वनिता विद्यालयाच्या शिक्षकांनी सांगितले की, वेळच्यावेळी गटारांची स्वच्छता केली जात नसल्यामुळे दर पावसाळ्यात तुंबलेल्या गटारीचे पाणी आमच्या शाळेच्या आवारात शिरत असते त्यामुळे अस्वच्छता आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे गटारातील सांडपाण्यासह घाण गाळ, प्लास्टिकचा कचरा वगैरे शाळेच्या आवारात पसरत असल्यामुळे विद्यार्थीवर्गासह शाळेतील शिक्षकांना येण्या-जाण्याचा त्रास होत आहे.
तुंबलेल्या सांडपाण्यामुळे निसरड्या झालेल्या मार्गावरून ये-जा करताना घसरून पडल्याने विद्यार्थी दुखापतग्रस्त होत आहेत. एवढेच नव्हे तर शिक्षकांच्या दुचाकी गाड्या घसरून पडल्याने त्यांना अपघात अपघाताला सामोरे जावे लागले आहे.
या सर्व प्रकाराला जबाबदार कोण? शाळा आवारात गटारीचे सांडपाणी तुंबत असल्याची लेखी तक्रार महापालिका व बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डकडे वारंवार करून देखील त्याची दखल घेण्यात येत नसल्याची खंत व्यक्त करून शाळा आवारात साचणारे सांडपाणी आणि निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शिक्षिकांनी शाळा मुख्याध्यापकांच्यावतीने केली आहे.