बेळगाव लाईव्ह विशेष : सीमाभागातील बहुतांश मराठा समाज हा शेती या पारंपरिक व्यवसायावर आधारती आहे. कित्येक तरुणांनी शिक्षणाच्या अभावामुळे सुतार, गवंडी, प्लम्बिंग, इलेक्ट्रिक मेस्त्री अशी कामे निवडली. कालांतराने अनेकांचे हे पारंपरिक व्यवसाय बनले. मात्र अलीकडच्या काळात या व्यवसायात देखील मराठा समाजातील तरुणांमध्ये संघटन नसल्याने हे व्यवसाय आता परप्रांतीयांनी काबीज केल्याचे दिसून येत आहे.
शेती कामासोबतच सुतार, गवंडी, प्लम्बिंग, इलेक्ट्रिक मेस्त्री अशी कामे करून आपला उदरनिर्वाह करणारे आणि हाच व्यवसाय पुढे ताकदीने वाढविणारे अनेक मराठा तरुण आज समाजात पाहायला मिळतात. परंतु याच तरुणांनी एखादे संघटन तयार करून आपल्यासह आपल्या समाजातील तरुणांनाही रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आपल्या हातात असणारे कौशल्य इतरांनाही शिकवून आपला व्यवसाय तेजीने चालवून प्रगती करणे गरजेचे आहे. मात्र अलीकडच्या काळात मराठा समाजातील तरुण भरकटत जात असल्याने या व्यवसायात देखील परप्रांतीयांनी आपला जम बसवला आहे.
व्यवसाय थाटताना स्पर्धात्मक किंमत ठरवावी लागते. एकाग्रता लागते याचबरोबर सातत्य देखील लागते. मात्र आपला समाज यात्रा, सण, उत्सव, कार्यक्रम, समारंभ यात इतका गुंतला जातो कि त्याला आपल्या व्यवसायाचे भान राहात नाही. आणि नेमकी हीच वेळ हेरून दुसऱ्याच व्यावसायिकाकडून व्यवसाय ओरबाडून घेतला जातो, याची अनेक उदाहरणे आहेत. अशावेळी आपण संघटितपणे रोजगार निर्माण करून आपला रोजगार आपल्या हातात ठेवणे गरजेचे आहे.
आता आपण संघटित नाही झालो तर परप्रांतीय येऊन आपल्या बेळगावची मुंबई करणार यात शंकाच नाही. आपल्या कामाप्रती आपली तळमळ असणे गरजेचे आहे. मराठा समाजातील व्यावसायिक तरुणांनी आपले संघटन तयार करून एखादी संघटना बनवून त्यात कामगार वर्गाला एकत्रित करावे, याच माध्यमातून स्पर्धात्मक किंमती, इतर व्यावसायिकांकडून दिली जाणारी किमतीतील तफावत आणि परिपूर्ण आभास करून मराठा समाजातील तळागातील तरुणांना व्यावसायिक दृष्टिकोनातून तयार करणे, आणि या माध्यमातून प्रगतीच्या दिशेने जाणे अत्यंत गरजचे आहे.
व्यावसायिक दृष्टिकोनातून आपल्या कामाची दिशा आणि आजवर झालेली दशा यावर विचार केल्यास आपला रोजगार आपल्या हाती टिकेल, अन्यथा रोजगार देखील आपल्याच चुकीमुळे निघून जाईल, यात शंका नाही.