बेळगाव लाईव्ह :शहापूर येथील रस्त्याच्या प्रकरणामुळे हात पोळलेल्या बेळगाव महापालिकेला पुन्हा एक दणका बसला आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे आणखी एका रस्त्यासाठी भूसंपादित केलेली जागा नाईलाजाने मूळ मालकाला परत करण्याची नामुष्की काल महापालिकेवर आली.
शहरातील खंजर गल्ली आणि जालगार गल्ली येथे गेल्या 15 वर्षापूर्वी खाजगी जागेतून रस्ता बांधण्यात आला होता. या रस्त्यासाठी मकबूल आगा यांची 800 चौरस फूट जागा भूसंपादित करण्यात आली होती. तथापि त्यांना कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आली नाही.
त्यामुळे मग मकबूल आगा यांनी बेळगाव दिवाणी न्यायालयामध्ये महापालिकेविरुद्ध दावा दाखल केला होता. न्यायालयाने नुकताच त्याच्या बाजूने निकाल देत महापालिकेला मालमत्ता त्याच्या हक्काच्या मालकाला परत करण्याचे आदेश दिले.
या आदेशाचे पालन करताना मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या देखरेखीखाली काल गुरुवारी पालिका अधिकाऱ्यांनी जेसीबी यंत्राच्या सहाय्याने रस्ता उघडून काढून जागा आगा यांच्या ताब्यात दिली.
जालगार गल्लीतील सदर जमीन परत देण्याच्या या कार्यवाहीप्रसंगी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिकेसाठी हा आणखी एक धक्का आहे, कारण जमिनीवर पुन्हा दावा केल्याने मोबदला आणि शहरातील जमिनीचा वापर यासंबंधीच्या समस्यांवर प्रकाश पडतो.