बेळगाव लाईव्ह :सुरळीत वीज पुरवठ्यासाठी हेस्कॉमला वेळोवेळी दुरुस्तीच्या कामाकरिता दिवसभर वीज खंडित करावी लागत असली तरी दुरुस्तीचे काम अत्यंत तातडीची गरज असल्याखेरीज रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी केले जाऊ नये. दिवसभर वीज पुरवठा खंडित करायचा असेल तर तो रविवार वगळता आठवड्याभरात अन्य कोणत्याही दिवशी पूर्वसूचना देऊन करावा. त्यासाठी लोकांच्या रविवार सुट्टीच्या दिवसावर विरजण टाकू नये, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी घरातील गृहिणींनी कपडे धुणे, फरशी पुसणे, घर स्वच्छ करणे, भांडी धुणे अशा कामांचा बेत आखलेला असतो. त्यानंतर कुटुंबातील संपूर्ण सदस्यांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण ही कामे त्यांना करावी लागतात. मसाला तयार करण्यासाठी त्यांना मिक्सर, खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटर आणि कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनची गरज लागते. अशावेळी दिवसभर वीज पुरवठा खंडित झाल्यास गृहिणींची मोठी गैरसोय होऊन त्यांचे दिवसभराचे कामाचे वेळापत्रकच कोलमडते.
रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी नातेवाईक, मित्र, हितचिंतक यांच्यासोबत घरी थोडी मौज करण्याच्या नागरिकांच्या उत्साहावर वीज नसल्यामुळे पाणी फिरते. तसेच रविवारी सकाळपासून रात्रीपर्यंत टीव्हीवर विशेष संगीत, मनोरंजनाचे कार्यक्रम असतात. पालकांना त्रास होऊ नये म्हणून मुले कार्टून पाहतात. काही पालक स्वतःच्या मनोरंजनासाठी चित्रपट पाहतात. मात्र रविवारी दिवसभर वीज पुरवठा खंडित असल्यास विशेषतः काम करणाऱ्या लोकांसाठी दैनंदिन जीवन कंटाळवाणे बनते. सोमवार ते शनिवार लोक ऑफिसमध्ये मेहनत करतात आणि एक दिवस त्यांना सुट्टी मिळते आणि सरकार वीज काढते. जर सरकारला वीज काढायची असेल तर ती सोमवार ते शनिवार या कालावधीत एक दिवस सुट्टी जाहीर करून काढली जावी असे सर्वसामान्य त्रस्त नागरिकांचे मत असून त्यासाठी तुम्ही आमची साप्ताहिक सुट्टी का खराब करता? असा त्यांचा सवाल आहे.
शहरातील लहान हॉस्पिटल्स जिथे विविध वैद्यकीय उपकरणांसाठी सुरळीत वीज पुरवठा आवश्यक असतो, तेथे दिवसभर वीज गायब झाल्यास रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. फुफ्फुसाची समस्या असलेल्या काही वृद्ध रुग्णांना घरात विजेवर चालणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची आवश्यकता असते. या रुग्णांच्या बाबतीत दुरुस्तीसाठी कांही काळ वीज खंडित केली गेली तर ठीक अन्यथा दिवसभर वीज नसल्यास बाका प्रसंग उद्भवण्याची शक्यता असते. याची प्रचिती काल रविवारी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांना आली. त्यांना काल एका रुग्णाच्या मुलीचा ऑक्सिजन सिलेंडरसाठी मदतीसाठी फोन आला होता. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर चालवण्यासाठी विजेची गरज असते. जर वीज नसेल तर अशा रुग्णाला बराच त्रास सहन करावा लागतो. संबंधित रुग्णाला एकतर दवाखान्यात घेऊन जावे लागते किंवा ऑक्सिजन सिलिंडर पुरवणाऱ्या ऑक्सिजन प्लांटचा शोध घ्यावा लागतो. मात्र रविवार असले तर ऑक्सिजनचा पुरवठादार शोधण्यात अडचण येते.
हीच परिस्थिती काल रविवारी उद्भवली होती, मात्र संतोष दरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या परिस्थितीवर मात करून संबंधित रुग्णासाठी ऑक्सिजनची सोय करून दिली. तेंव्हा हेस्कॉमने रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी दिवसभर वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रकार तात्काळ थांबवावा. त्याऐवजी रविवार वगळता आठवड्याभरात कोणत्याही एका दिवशी पूर्वसूचना देऊन दिवसभर वीज काढावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.