बेळगाव लाईव्ह:कंग्राळी खुर्द येथील बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) भाजीपाला मार्केट यार्डची अवस्था सध्या निर्मनुष्य झपाटलेल्या जागेप्रमाणे झाली आहे. तेंव्हा सरकारने या जागेचा वापर एक तर गोशाळेच्या उभारणीसाठी अथवा खेळांसाठी करावा. जेणेकरून येथील मोठे गाळे मुलांना टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम, स्केटिंग, थ्रोबॉल, हॉलीबॉल इत्यादी खेळ खेळण्यासाठी वापरता येईल, असे मत व्यक्त होत आहे.
एपीएमसी मार्केट यार्ड येथील कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले भाजी मार्केट सध्या धूळखात पडून आहे. प्रचंड आकाराच्या या भाजी मार्केटमधील दुकान गाळ्यांची चिटपाखरूही नसल्यामुळे भकास अवस्था झाली आहे. निर्मनुष्य असलेल्या या भाजी मार्केटमध्ये फेरफटका मारला असता तेथील भकासपणा व निरव शांततेमुळे आपण एखाद्या झपाटलेल्या जागेत तर वावरत नाही ना? अशी असे वाटते. तसेच सदर मार्केटच्या उभारणीसाठी खर्च करण्यात आलेले कोट्यावधी रुपये वाया गेल्याचे जाणवते.
एकंदर बेळगाव एपीएमसी येथील नव्या भाजी मार्केटचा हा प्रकल्प का अयशस्वी झाला? आणि या मार्केट यार्डचे वैभव कसे परत येईल? यावर शासनाने संशोधन करण्याची गरज आहे. नवीन स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या आणि भाजीपाला विपणनमध्ये (व्हेजिटेबल मार्केटिंग) करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना सरकारने वाव दिला पाहिजे.
जुने व्यापारी पुन्हा या ठिकाणी परत येतील ही अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे. बेळगाव शहरातील बापट गल्ली, पांगुळ गल्ली, रविवार पेठेत गोदामासाठी जागा मिळत नाही असे अनेक घाऊक व्यापारी आहेत. गरज भासल्यास सरकार त्यांना एपीएमसी मार्केट यार्ड येथे हलवू शकते. यामुळे नेहमी गजबजलेल्या असणाऱ्या रविवार पेठेतील मल्टीपल एक्सेल ट्रक किंवा इतर वाहनांची वाहतूक देखील कमी होईल.
हे जमत नसेल तर या जागेचा वापर एक तर गोशाळेच्या उभारणीसाठी अथवा खेळांसाठी करावा. जेणेकरून येथील मोठे गाळे आणि खुली जागा मुलांना टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम, स्केटिंग, थ्रोबॉल, हॉलीबॉल इत्यादी खेळ खेळण्यासाठी वापरता येईल, असे मत व्यक्त केले जात आहे.