बेळगाव लाईव्ह : पंढरपूर येथे वारीत हरवलेले बेळगावचे वृध्द पुण्यात सापडले आहेत. सोशल मीडियातील बातमीमुळे हरवलेली व्यक्ती सापडली असून ते बेळगावला सुखरूप घरी पोहोचले आहेत.
पंढरपूर येथे वारीला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेली बेळगावची वृध्द व्यक्ती पंढरपूर मध्ये हरवते आणि ‘बेळगाव लाईव्ह’ या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केवळ एका पोस्टमुळे ती व्यक्ती सापडते ही सकारात्मक बाब गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून घडली आहे. पंढरपूरला वारीसाठी गेलेले मूळचे होसूर बसवण गल्ली सध्या संभाजी नगर वडगाव येथील 84 वर्षीय प्रभाकर भातकांडे हे पंढरपूर मधून हरवले होते. त्याची बातमी गेल्या शनिवारी ‘बेळगाव लाईव्ह’च्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली होती.
केवळ बेळगावच नव्हे तर महाराष्ट्रभर सोशल मीडियाच्या माध्यमातून या बातमीचा प्रसार झाला. या बातमीमुळेच पंढरपूर मधून हरवलेल्या प्रभाकर भातकांडे यांचा पुणे येथे शोध लागला.
प्रभाकर भातकांडे हे पंढरपूर मध्ये वारीत हरवल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शनिवारी ते हरवल्यानंतर बुधवारपर्यंत त्यांचे कुटुंब तणावाखाली होते. मात्र पुणे येथील धनकवडी पोलिसांचा फोन आल्यानंतर भातकांडे कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. गुरुवारी प्रभाकर भातकांडे घरी परतले त्यावेळी त्यांची आरती ओवाळून कुटुंबीयांनी जल्लोषी स्वागत केले. प्रभाकर भातकांडे हे माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांचे दीर तर प्रशांत भातकांडे यांचे काका आहेत. ज्यावेळी पुणे येथे हरवलेले प्रभाकर भातकांडे सापडले त्यावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. गेले 4 दिवस तणावात असलेले भातकांडे कुटुंबीय हरवलेली व्यक्ती मिळाल्याने आनंदी वाटत होती.
सोशल मीडियाच्या निगेटिव्ह गोष्टी फक्त समाजामध्ये पसरल्या गेल्या आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून काही सकारात्मक बाबी देखील समाजात दररोज घडत असतात त्याचाच प्रत्यय या घटनेवरून आलेला आहे.