बेळगाव लाईव्ह :मराठी भाषिक वकील संघटना, बेळगाव यांच्यावतीने वकिलांच्या गुणवंत मुलींचा अलीकडेच झालेल्या एसएसएलसी परीक्षेतील सुयशाबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.
चव्हाट गल्ली बेळगाव येथील श्री जालगार मारुती मंगल कार्यालयामध्ये या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्कार मूर्ती म्हणून एसएसएलसी परीक्षेत 99.58 टक्के मिळवून बेळगाव जिल्ह्यात प्रथम आलेली कु. तनिष्का शंकर नावगेकर आणि 98.5 टक्के गुण मिळवणारी कु. ऐश्वर्या सतीश बांदिवडेकर या दोघी उपस्थित होत्या.
प्रारंभी ॲड. अनिल सांबरेकर यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. समारंभात कु. तनिष्का हिचा तिचे पालक ॲड. शंकर नावगेकर आणि सौ नावगेकर यांच्या समवेत शाल श्रीफळ ट्रॉफी व रोख रक्कम देऊन संघटनेचे अध्यक्ष ॲड. ए. एम. पाटील, ॲड. विजयकुमार होनमणी, ॲड. अनिल सांबरेकर, ॲड. गजानन पाटील, ॲड. सुधीर पाटील आणि ॲड. प्रफुल्ल टपालवाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ॲड. सांबरेकर, ॲड. अमर येळ्ळूरकर, ॲड. सुधीर चव्हाण व ॲड. बोळगोजी यांच्या हस्ते ऐश्वर्या बांदिवडेकर हिला शाल, श्रीफळ व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना ॲड. शंकर नावगेकर यांनी आपली मुलगी तनिष्का हिच्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षकवर्गाला देऊन त्यांच्याच मार्गदर्शनामुळे ती यशस्वी झाल्याचे सांगितले. ॲड. लक्ष्मण पाटील यांनी बहुजन समाजातील मुला-मुलींनी नवनवीन शिखरापर्यंत विजयी पताका फडकवावी. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून जीवनाची वाटचाल करावी असे आवाहन करून दोन्ही विद्यार्थिनींना रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार केला.
तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ॲड. ए. एम. पाटील यांचेही शुभेच्छा पर भाषण झाले. समारंभास ॲड. सोमनाथ जायण्णाचे, ॲड. बी. एच. बिळगोजी, ॲड. मोदगेकर, ॲड. टपालवाले, ॲड. राजेंद्र पवार, ॲड. होनगेकर, ॲड. शरयू हिंडलगेकर, ॲड. श्रीकांत पवार, ॲड. सतीश बांदिवडेकर, ॲड. जगदीश हलगेकर आदींसह संघटनेचा वकील वर्ग आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.