बेळगाव लाईव्ह : ‘म्हादई’प्रश्नी गोवा सरकार योग्य मार्गावर असून कर्नाटकाच्या पोटात का दुखत आहे? हे आपल्याला कळत नाही, अशी खरमरीत प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. म्हादई जलविवाद प्रकरणी दोन दिवसांपूर्वी प्रवाह प्राधिकरणाने म्हादई खोऱ्याला भेट दिली.
दरम्यान या विरोधात कर्नाटकात याचा निषेध नोंदवत बेळगावमधील कित्तूर राणी चन्नम्मा चौकात गोवा बस अडवून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे छायाचित्र जाळण्यात आले.
या प्रकारावर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, प्रवाह हे स्वतंत्र प्राधिकरण आहे. महादयी जल विवाद न्यायाधिकरणाच्या निर्णयांचे पालन आणि अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाने गेल्या वर्षी मे महिन्यात प्रवाह प्राधिकरणाची स्थापना केली होती. या पथकाने प्रक्रियेचा भाग म्हणून म्हादई खोऱ्याला भेट दिली.
गोव्याने प्रवाह तपासणीचे स्वागत केले आहे. प्राधिकरण निष्पक्ष तपासणी करेल आणि गोव्यासाठी योग्य निर्णय घेईल असा विश्वास आहे. म्हादई प्रकरणी आम्ही योग्य मार्गावर आहोत याचाच पुरावा बेळगावमध्ये झालेल्या घटनेवरून मिळतो, शिवाय म्हादई प्रश्नी कर्नाटक सरकारच्या खोटेपणाचा पर्दाफाश झाला अशी टिप्पणीही त्यांनी केली.
‘प्रवाह’च्या पाहणी नंतर प्रवाह पथक लवकरच केंद्राला अहवाल सादर करेल. दरम्यान, सोमवारी, प्रवाह आणि कर्नाटक तसेच गोव्यातील अधिकाऱ्यांनी म्हादई प्रकल्पाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बंगळुरू येथे बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील मोठ्या आणि लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालावर (डीपीआर) चर्चा करण्यात आल्याचे प्रमोद सावंत यांनी सांगितले.