Sunday, December 22, 2024

/

मारहाण प्रकरणातून माजी सैनिकाची निर्दोष मुक्तता

 belgaum

बेळगाव लाईव्ह:महालक्ष्मीनगर, गणेशपूर येथे गेल्या एप्रिल महिन्यात घडलेल्या रिक्षा चालकाला मारहाण करण्याच्या प्रकरणातून बेळगावचे पाचवे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) आणि जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी साक्षीदारातील विसंगतीमुळे एका माजी सैनिकाची निर्दोष मुक्तता केली आहे.

न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या माजी सैनिकाचे नांव बळीराम भरमा सावंत (वय 48, रा. दुसरा क्रॉस, महालक्ष्मीनगर, गणेशपुर -बेळगाव) असे आहे. या प्रकरणाची माहिती अशी की, महालक्ष्मीनगर 5 वा क्रॉस गणेशपुर येथील फिर्यादी ललिता श्रीकांत पवार यांचा ऑटोरिक्षा चालक मुलगा संदीप पवार हा गेल्या 21 एप्रिल 2022 रोजी रात्री 9 च्या सुमारास आपली रिक्षा (क्र. केए 22 डी 6109) घेऊन घरी निघाला होता.

त्यावेळी आरोपी बळीराम हा आपल्या मोटरसायकल (क्र. केए 22 एचसी 1346) वरून आपली पत्नी व मुलाला घेऊन घरी जात होता. त्यावेळी आरोपीच्या गाडीने रिक्षाला समोरून धडक दिली. त्यानंतर दोघांमध्ये वादावादी होऊन त्याचे पर्यवसान आरोपीने रागाच्या भरात संदीप याला मारहाण करण्यामध्ये झाले. या मारहाणीत संदीप रक्तबंबाळ झाला.

स्थानिक रहिवाशांनी भांडण सोडवल्यानंतर जखमी संदीपला त्याची आई ललिता आणि इतरांनी उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आपल्या मुलाला मारहाण झाल्याबद्दल ललिता पवार यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

तक्रारीची दखल घेत कॅम्प पोलिसांनी आरोपी बळीराम सावंत याच्यावर भा.द.वि. कलम 341, 323, 326 अन्वये गुन्हा दाखल केला आणि तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

न्यायालयात फिर्यादी व जखमी तसेच इतरांच्या साक्षी तपासण्यात आल्या. तथापि साक्षीदारांमधील विसंगतीमुळे आरोपी माजी सैनिक बळीराम भरमा सावंत याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने ॲड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.