बेळगाव लाईव्ह:हाय, हॅलो करत इंस्टाग्रामच्या माध्यमातून वाढलेल्या संपर्काचे प्रेमात रूपांतर होऊन विवाहबद्ध झालेल्या बेंगलोरची युवती आणि बेळगावचा युवक अशा एका प्रेमी युगुलाने युवतीच्या घरच्यांच्या विरोधामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांकडे संरक्षणाची मागणी केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, खानापूर येथील रोहित कोलकार याने साधारण वर्षभरापूर्वी इंस्टाग्रामवर पाठविलेल्या फ्रेंड रिक्वेस्टला बेंगलोर येथील प्रियांका गौडा हिने सहज म्हणून प्रतिसाद दिला. मात्र त्यानंतर उभयतांमध्ये इंस्टाग्रामवर संपर्क वाढवून त्याचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. प्रियांकाच्या आई-वडिलांचे तिच्या लहानपणीच निधन झाले असून सख्ख्या मामाने तिला लहानाचे मोठे केले आहे.
अलीकडे एका लग्नानिमित्त बेळगावला आलेली प्रियांका रोहितच्या घरी वास्तव्यास होती. त्यावेळी तिला रोहितचे घर आणि घरातील लोकांचा स्वभाव खूपच आवडला आणि तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि प्रियांका यांच्या लग्नाला रोहितच्या घरच्यांची संमती असली तरी प्रियांकाच्या सख्ख्या मामाचा विरोध आहे.
हा विरोध लक्षात घेऊन प्रियांकाने लग्नाच्या नोंदणी करिता आवश्यक जन्मदाखला वगैरे कागदपत्रे तसेच आपल्या नावावरील मालमत्तेची कागदपत्रे आपल्याला मिळवून द्यावीत, अशी लेखी विनंती महिनाभरापूर्वी खानापूर पोलिसांकडे केली आहे.
त्यानंतर आज मंगळवारी सकाळी खानापूर तालुक्यातील पारिश्वाड येथील एका मंदिरात विवाहबद्ध झालेल्या रोहित आणि प्रियांका या नवदांपत्याने थेट जिल्हा पोलीस प्रमुखांचे कार्यालय गाठले. तसेच सख्ख्या मामाच्या मर्जी विरुद्ध विवाह केला असल्यामुळे त्याच्यापासून आम्हाला धोका आहे अशी लेखी तक्रार आणि आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी लेखी प्रियांका हीने जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. भीमाशंकर गुळेद यांच्याकडे केली. जिल्हा पोलीस प्रमुखांनी देखील विवाहबद्ध झालेले नवदांपत्य सज्ञान असल्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेऊन खानापूर पोलिसांना रोहित व प्रियांका यांना कायद्याच्या चौकटीत संरक्षण पुरवण्याची तसेच त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली. त्याचप्रमाणे विवाह नोंदणीसाठी जी कागदपत्रे आवश्यक आहेत ती आपण बेंगलोर येथील पोलिसांच्या मदतीने मिळवू शकता असा सल्ला जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. गुळेद यांनी नव दाम्पत्याला दिला. तसेच त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
रोहित व प्रियांका या नवदाम्पत्याची तक्रार आणि मागणीची दखल घेतल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले की, सज्ञान युवक व युवती स्वतःहून परस्पर संमतीने विवाहबद्ध झाले असल्यास आणि कांही कारणास्तव त्यांनी संरक्षणाची मागणी केल्यास कायद्यानुसार ती पुरवणे आमचे कर्तव्य आहे. त्यानुसार रोहित व प्रियांका यांच्या बाबतीत आम्ही ते कर्तव्य पार पाडत आहोत.
विवाहच्या नोंदणीसाठी आवश्यक जन्म दाखला वगैरे कागदपत्रे तिला मिळवून दिली जातील. तथापि तिने जी मालमत्तेच्या कागदपत्रांची मागणी केली आहे, त्याची पूर्तता करणे आमच्या अधिकारात येत नाही. त्यासाठी तिला न्यायालयाची मदत घ्यावी लागेल, असे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. गुळद यांनी स्पष्ट केले.